Team India : टीम इंडियावर टांगती तलवार म्हणजे ‘डेथ ओव्हर्स’, जाणून घ्या काय आहे प्रकरण… | पुढारी

Team India : टीम इंडियावर टांगती तलवार म्हणजे ‘डेथ ओव्हर्स’, जाणून घ्या काय आहे प्रकरण...

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India : अगामी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. जी काही केल्या संपण्याचे नाव घेत नाहीय. भारतीय संघाच्या गोलंदाजीदरम्यान फेकण्यात येणारे ‘19 वे षटक’ ही ती समस्या आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजीची पिसे काढत प्रतिस्पर्धी संघ 19 व्या षटकात धावांची लयलूट करताना अनेक सामन्यांमध्ये पहायला मिळाले आहे. ज्यामुळे विजय मिळत असलेल्या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागतो आहे. आशिया चषक स्पर्धेपासून सुरू झालेल्या या समस्येचे निराकरण द. आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतही मिळालेले नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या टेन्शनमद्ये चांगलीच वाढ झाली आहे.

कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग करताना 19 वे षटक महत्त्वाचे मानले जाते. बहुतेक वेळा या षटकात विजयाचे पारडे कोणत्या संघाच्या बाजूने झुकणार हे ठरवते. गुवाहाटीमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी 20 सामन्या दरम्यान, अर्शदीप सिंगने 19 वे षटक फेकले. या षटकात त्याने दोन षटकार-दोन चौकारांसह एकूण 26 धावांची देणगी दिली. यादरम्यान त्याने नो बॉलही टाकला. हे षटक कसे फेकले गेले त्याचा एक आढवा घेऊया…

अर्शदीपने 19 व्या षटकाचा पहिला चेंडू नो बॉल टाकला. मात्र, डेव्हिड मिलरने एक धाव घेतली. त्यानंटर क्विंटन डी कॉकला फ्री हिट बॉलचा फायदा घेता आला नाही आणि त्याने एक रन घेत मिलरला स्ट्राइक दिले. तिसऱ्या चेंडूवर त्याने डीप मिड-विकेटच्या दिशेने षटकार ठोकला, तर चौथ्या चेंडूवर बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चौकार लगावला. मिलर इथेच थांबला नाही, त्याने पाचव्या चेंडूवर चौकार आणि शेवटच्या सहाव्या चेंडूवर षटकार मारून अर्शदीपच्या या षटकात 26 धावा वसूल केल्या. अर्शदीपने आपल्या 4 षटकांच्या कोट्यात 62 धावा दिल्या. कोणत्याही भारतीय वेगवान गोलंदाजाने टी20 क्रिकेटमध्ये दिलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. (Team India)

20व्या षटकातसुद्धा 20 धावा…

मिलर आणि क्विंटन डी कॉकची वादळी खेळी 20 व्या षटकातही कायम राहिली. शेवटचे षटक फेकण्यासाठी कर्णधार रोहितने चेंडू डावखुरा ऑफस्पिनर अक्षर पटेलकडे सोपवला. या षटकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर मिलरने बॅक टू बॅक षटकार ठोकले आणि स्वत:चे शतक पूर्ण केले. हे त्याचे टी 20 कारकिर्दीतील दुसरे शतक ठरले. यानंतर क्विंटन डी कॉकने अक्षराच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून सामना संपवला. 238 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला निर्धारित 20 षटकांत 3 गडी गमावून 221 धावाच करता आल्या. मिलरने नाबाद 106 आणि क्विंटन डी कॉकने नाबाद 69 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल (57) आणि सूर्यकुमार यादव (61) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 238 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. यादरम्यान विराट कोहलीनेही 49 धावांची नाबाद खेळी खेळली. (Team India)

Back to top button