David Miller : रोहित, विराटनेही मानलं... दक्षिण आफ्रिकेने सामना गमावला तरी मिलर 'जिंकला'! | पुढारी

David Miller : रोहित, विराटनेही मानलं... दक्षिण आफ्रिकेने सामना गमावला तरी मिलर 'जिंकला'!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारताने दुसर्‍या टी-२० सामन्‍यात दक्षिण आफ्रिकेचा १६ धावांनी पराभव केला. तीन सामन्‍यांच्‍या मालिकेत  2-0 अशी आघाडी घेतली आहे. रविवारी ( दि. २ ) झालेला सामना भारताने जिंकला असला तरी दक्षिण आफ्रिकेचा डेव्‍हिड मिलर याने केलेल्‍या फलंदाजीने टीम इंडियातील खेळाडूंसह क्रिकेट रसिकांची मने जिंकली. याची खेळ एवढी प्रभावी होती की, सामना संपल्‍यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली या दोघांनी मिलरची गळाभेट घेत त्‍यांच्‍या झुंझार खेळीचे मन;पूर्वक कौतूक केले. हा सामना दक्षिण आफ्रिकेने गमावला असला तरी ( David Miller ) मिलर मात्र आपल्‍या खेळीने जिंकला, अशी भावना क्रिकेटप्रेमींमध्‍ये होती.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंम्बा बवुमाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यांनतर भारताने प्रथम फलंदाजी करत २३७ धावा केल्या आहेत. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २३८ धावांचे आव्हान ठेवले आहे. सुर्यकुमार यादव आणि के.एल. राहुल यांच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने ही मोठी धावसंख्या उभी केली. भारताकडून सुर्यकुमार यादवने ५ चौकार आणि ५ षटकार लगावत २२ चेंडूमध्ये ६१ धावा काढल्या. तर के.एल. राहुलने ५ चौकार आणि ४ षटकार लगावत २८ चेंडूमध्ये ५७ धावा काढल्या. सुर्यकुमार यादव आणि के.एल.राहुल यांच्या पाठोपाठ विराट कोहलीनेही २८ चेंडूमध्ये ४९ धावांची खेळी केली.

David Miller : मिलरच्‍या खेळीने सारेच आवाक

भारताने आफ्रिकेसमोर २३८ धावांचे आव्हान ठेवले होते. याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात उतरला. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्‍यंत खराब झाली. मात्र डेव्‍हिड मिलर फलंदाजीला आला आणि पाहता पाहता चित्र बदललं. मिलर याने ४७ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकार फटकावत १०६ धावांची नाबाद खेळी केली. त्‍याच्‍या झूंज अपयशी ठरली मात्र त्‍याने केलेली खेळीमुळे सारेच आवाक झाले. त्‍याने केलेल्‍या धुवांधार फलंदाजीला सर्वांनीच दाद दिली. सामना संपल्‍यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांनी मिलरची गळाभेट घेत त्‍याचे विशेष अभिनंदन केले. तसेच प्रेक्षकांनीही त्‍याच्‍या खेळीला उत्‍स्‍फूर्त दाद दिली.

मिलरच्‍या नावावर नव्‍या विक्रमाची नोंद

धमाकेदार फलंदाजीमुळे डेव्‍हिड मिलरच्‍या नावावर एका नव्‍या विक्रमाची नोंद झाली आहे. त्‍याने टी-२० फॉर्मटमध्‍ये ५ स्‍थानांवर फलंदाजीला येवून एकापेक्षा अधिकवेळा शतकी खेळी केली आहे. त्‍याने २०१७ मध्‍ये बांगलादेश विरुद्‍धच्‍या सामन्‍यात ३६ चेंडूमध्‍ये १०१ धावांची खेळी केली होती. विशेष म्‍हणजे याही डावात तो नाबाद राहिला होता.

 

Back to top button