IND vs SA 1st T20I : हार्दिक पंड्याच्‍या जागी कोण खेळणार? 'या' खेळाडूला संधी मिळण्‍याची शक्‍यता | पुढारी

IND vs SA 1st T20I : हार्दिक पंड्याच्‍या जागी कोण खेळणार? 'या' खेळाडूला संधी मिळण्‍याची शक्‍यता

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि दक्षिण अफ्रिका संघात आज पहिला टी-२० सामना होणार आहे. तीन टी-२० सामन्‍यांच्‍या या मालिकेत हार्दिक पंड्या आणि भुवनेश्‍वर कुमार यांना विश्रांती देण्‍यात आली आहे. फिटनेसचा विचार करता काहींच्‍या Playing XI मध्‍ये समावेश होणार का याबाबत संभ्रम कायम आहे. जाणून घेवूया तिरुअनंतपूरम येथे आजच्‍या सामन्‍यात हार्दिक आणि भुनवेश्‍वर यांच्‍याऐवजी कोणाला स्‍थान मिळणार याविषयी. ( IND vs SA 1st T20I )

ऑस्‍ट्रेलिया विरुद्ध टी-२० मालिका भारताने दिमाखात जिंकली. या मालिकेतील पहिला सामना गमावल्‍यानंतर भारताने सलग दोन सामन्‍यांत विजय मिळत आपले टी-२० फॉर्मेटमधील वर्चस्‍व पुन्‍हा एकदा सिद्ध केलं. आता ऑस्‍ट्रेलियात होणार्‍या टी-२० विश्‍वचषकापूर्वी भारतासाठी या मालिकेतील तीन सामने महत्त्‍वाचे ठरणार आहेत. या तीन सामन्‍यांतील खेळाडूंच्‍या कामगिरीवरही मुख्‍य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांचे विशेष लक्ष असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ची टी-२० मालिका आव्‍हानात्‍मक असणार आहे. कारण मागील याच संघाविरुद्‍धची टी-२० मालिका दोन-दोन अशी बरोबरीत सुटली होती. त्‍या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांच्‍यासह मुख्‍य खेळाडूंना विश्रांती दिली होती. ऋषभ पंत याने भारतीय संघाचे नेतृत्त्‍व केले होते.

आज हार्दिक पंड्याऐवजी संघात दीपक चहर याची निवड होईल, असे मानले जात आहे. कारण ऑस्‍ट्रेलियाविरुद्‍धच्‍या टी-२० मालिकेत त्‍याला संधी मिळाली नव्‍हती. विश्‍वचषक संघात निवड झालेल्‍या सर्व खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी कर्णधार रोहित शर्मा प्रयत्‍नशील असेल. त्‍यामुळे आजच्‍या सामन्‍यात अक्षर आणि चहल यांना संधी दिली तरी अश्‍विन याचाही विचार होवू शकतो, असे मानले जात आहे.

IND vs SA 1st T20I :`डेथ ओव्हर`मध्‍ये वेगवान गोलंदाजांची लागणार कसोटी

हर्षल पटेल याने दुखापतीतून सावरल्‍यानंतर ऑस्‍ट्रेलियाविरुद्‍ध संघात स्‍थान मिळवले. मात्र त्‍याने या मालिकेत प्रतिषटक १२ धावा दिल्‍या. तर भुवनेश्‍वर कुमार याने दोन सामन्‍यांत ९१ धावा दिल्‍या. या मालिकेतही डेथ ओव्‍हरमध्‍ये धावा रोखण्याचे मुख्‍य आव्‍हान वेगवान गोलंदाजांसमोर असेल.

संभाव्‍य भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल. राहुल ( उपकर्णधार ), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक
( यष्‍टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्‍विन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

हेही वाचा :

Back to top button