Eng W vs Ind W 3rd ODI : झुलन गोस्वामीला विजयी निरोप | पुढारी

Eng W vs Ind W 3rd ODI : झुलन गोस्वामीला विजयी निरोप

लंडन, वृत्तसंस्था : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने आपली दिग्गज संघ सहकारी झुलन गोस्वामी हिला विजयी निरोप दिला. लॉर्डस्वर वेगवान गोलंदाज झुलनच्या निरोपाच्या वन-डे सामन्यात भारताने इंग्लंडवर (Eng W vs Ind W 3rd ODI) 16 धावांनी मात केली आणि यजमान संघाला 3-0 असा व्हाईट वॉश दिला. इंग्लंड महिला संघाने भारतीय महिला संघाला 169 धावांत गुंडाळले. त्यानंतर भारताने इंग्लंडला 153 धावांत ऑलआऊट केलेे. सामन्याचा शेवट अतिशय नाटकी झाला. भारताने पहिल्या विकेटस् लवकर गुंडाळून विजय निश्चित केला होता; परंतु एमी जोन्स, चार्ली डीन यांनी झुंज देत इंग्लंडला विजयाची आशा दाखवली. परंतु दीप्ती शर्माने डीनला ‘मंकडिंग’ पद्धतीने बाद केले अन् भारताचा मालिका विजय साकारला.

ऐतिहासिक लॉर्डस् मैदानावर दोन्ही संघांतील हा तिसरा एकदिवसीय सामना झाला. भारताकडून स्मृती मानधना (50), दीप्ती शर्मा (68*) आणि पूजा वस्त्रकार (22) या तिघी वगळता बाकी सर्वांनी एकेरी धावा केल्या. इंग्लंडकडून केट क्रॉसने 26 धावांत 4 विकेटस् घेतल्या.
हे आव्हान इंग्लंडला पेलवले नाही. त्यांचा डाव 153 धावांत संपुष्टात आला. एमा लॅम्ब (21) आणि एमी जोन्स (28), चार्ली डीन (47) यांनी प्रतिकार केला. जोन्स आणि डीन यांनी 38 धावांची भागीदारी करून भारताचा विजय लांबवला. डीनने फ्रेया डेव्हिसच्या साथीने संघाला विजयाच्या जवळ आणले होते; परंतु दीप्ती शर्माने डीनला ‘मंकडिंग’ पद्धतीने धावचित करून भारतीय संघाला विजयी केले. भारताच्या रेणुका सिंगने 4 तर राजेश्वरी गायकवाडने 2 विकेटस् घेतल्या. शेवटचा सामना खेळणार्‍या झुलनने 2 विकेटस् घेत विजयात हातभार लावला.

तत्पूर्वी, नाणेफेकीवेळी भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने झुलन गोस्वामीला बरोबर नेत तिचा सन्मान केला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले. स्मृती आणि शेफाली यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. इंग्लंडच्या केट क्रॉसने भारतीय टॉप ऑर्डरला सुरुंग लावला. तिने शेफाली वर्मा (0), यास्तिका भाटिया (0), हरमनप्रीत कौर (4) यांना लवकर बाद करून भारतावर दबाव आणला. गेल्या सामन्यातील अर्धशतक करणारी हरलीन देओल (3) स्वस्तात बाद झाल्यावर स्मृती आणि दीप्ती यांनी 4 बाद 29 वरून पुढे डाव सावरला. स्मृतीने 77 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि ती बाद झाली. केट क्रॉसनेच तिला बाद केले. यानंतर दीप्तीला पूजाने थोडीफार साथ दिली. दीप्तीने 78 चेंडूंत अर्धशतक गाठले. पूजा वस्त्रकार (22) बाद झाल्यावर भारताचा डाव लगेच संपुष्टात आला. भारताच्या पाच बॅटर शून्यावर बाद झाल्या. यात शेवटचा सामना खेळणार्‍या झुलनचाही समावेश आहे.

चकदा एक्स्प्रेसला लॉर्डस्वर ‘गुडबाय’ (Eng W vs Ind W 3rd ODI)

महिला क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आणि चकदा एक्स्प्रेस नावाने ओळखली जाणारी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी ऐतिहासिक लॉर्डस् मैदानावर आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली. लॉर्डस्वर खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते, तसेच या मैदानावर शतक किंवा पाच गडी बाद करणे हे मोठे यश मानले जाते. फार कमी खेळाडूंना या ऐतिहासिक मैदानावर आपल्या कारकिर्दीचा अखेरचा सामना खेळण्याची संधी मिळते. सुनील गावसकर (आपला अखेरचा प्रथम श्रेणी सामना या मैदानावर खेळले होते), सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा किंवा ग्लेन मॅकग्रा यांसारख्या खेळाडूंनाही लॉर्डस्वर अखेरचा सामना खेळता आला नाही. मात्र, झुलनला या मैदानावर अखेरचा सामना खेळण्याची संधी मिळाली.

Back to top button