

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात शुक्रवारी तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना 6 गडी राखून जिंकला. त्याचवेळी हा सामना संपल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या छायाचित्रात मुख्य प्रशिक्षक मैदानाबाहेर उभ्या असलेल्या लोकांशी संवाद साधताना दिसत होते. त्यांचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. जाणून घेऊ या काय आहे या फोटो मागील प्रकरण आणि कोणत्या कारणामुळे चाहत्यांना तो आवडला.
23 सप्टेंबर रोजी खेळल्या गेलेल्या सामन्याची उत्सुकता पावसामुळे पूर्णपणे उधळली. ओल्या मैदानामुळे सामना सुरू होण्यास सुमारे अडीच तास उशिर झाला. मैदान कोरडे करण्यासाठी ग्राउंड स्टाफने खूप मेहनत घेतली. ग्राउंड स्टाप जमीन सुकविण्यासाठी वाळू ओतताना दिसत होते. मैदान सुकवायला पूर्ण दिवस पुरला नाही. मैदान कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेत मैदान खेळण्यायोग्य केले.
भारताच्या विजयानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड मैदानावर आला आणि त्याने मैदान सुकवण्यासाठी कष्ट घेणार्या ग्राउंड्समनच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली, त्यांचे आभार मानले. द्रविडच्या या कृतीने सर्वांची मने जिंकली. द्रविड ग्राउंड स्टाफशी बोलताना दिसला. त्यांच्या संभाषणाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या या वागण्याने चाहते खूप खूश झाले आणि सोशल मीडियावर त्याचे जोरदार कौतुक केले.
राेहित शर्माची जाेरदार फटकेबाजी (IND vs AUS)
रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात 230.00 च्या स्ट्राइक रेटने 20 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 46 धावांची खेळी केली. रोहित शर्माला त्याच्या फलंदाजीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याला हे विजेतेपद मिळवून देण्याची ही 12 वी वेळ होती.
टी-२० क्रिकेटमध्ये रोहितचं षटकारांचा बादशहा (IND vs AUS)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहितने ४ षटकार लगावत न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलला मागे टाकले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेविरूद्धच्या सामन्यात जॉश हेजलवुडच्या पहिल्याच षटकात रोहित शर्माने २ षटकार लगावल्यानंतर टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १७४ षटकार झाले आहेत.