रोहित शर्माने गांगुली, अझरुद्दीन आणि धोनीलाही टाकले मागे | पुढारी

रोहित शर्माने गांगुली, अझरुद्दीन आणि धोनीलाही टाकले मागे

पुढारी ऑनलाईन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात शतक ठोकणाऱ्या हिट मॅन रोहित शर्माने अजून एक विशेष कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५,००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सामिल झाला. असे करणारा तो भारताचा आठवा खेळाडू फलंदाज ठरला. या विशेष कामगिरीनंतर त्याचे नाव आता सचिन, द्रविड, विराट कोहली, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी, वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्या यादीत समाविष्ट झाले आहे.

इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या चौथ्या सामन्यात विदेशातील आपले पहिले कसोटी शतक ठोकणाऱ्या रोहितने आपल्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. ओव्हल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव २९० धावांवर आटोपला. यजमानांनी पहिल्या डावाच्या जोरावर भारतावर ९९ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी करत असताना रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १५ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. रोहितने हा आकडा गाठताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले.

रोहित या बाबतीत आहे धोनी, गांगुली आणि अझरुद्दीन यांच्याही पुढे

कमी डावात १५ हजार धावा पूर्ण करणाऱ्यांमध्ये भारतीय फलंदाजांमध्ये कर्णधार विराट कोहलीचे नाव पहील्या स्थानावर आहे. त्याने १५ हजार आंतरराष्ट्रीय धावा फक्त ३३३ डावांमध्ये पूर्ण केल्या होत्या. दुसऱ्या स्थानावर सचिन तेंडुलकरचे नाव आहे. सचिनने ३५६ डावांमध्ये अशी कामगिरी केली आहे. राहुल द्रविडने ३६८ डावांमध्ये पूर्ण केल्या आहेत. तर वीरेंद्र सेहवागने १५,००० धावा पूर्ण करण्यासाठी ३७१ डाव खेळले आहेत. हा टप्पा रोहितने ३९६ डावात पूर्ण केले.

रोहितने हा आकडा गाठताना माजी कर्णधार सौरव गांगुली आणि मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकले. गांगुलीने ४०० आणि अझरुद्दीनने ४३४ डावांनंतर हा आकडा गाठला होता. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १५ हजार धावा करण्यासाठी ४५२ डाव घेतले.

एकदिवसीय प्रमाणे कसोटीतही पाडतोय छाप

रोहित शर्माची कसोटी कारकिर्द त्याच्या एकदिवसीय कारकिर्दिप्रमाणे बदलत आहे. २०१३ मध्ये जेव्हा रोहित शर्मा सलामीवीर म्हणून फलंदाजीस आला तेव्हा त्याने ३ द्विशतके ठोकली. त्यानंतर वर्ल्ड कप २०१९ मध्येही रोहित शर्माची बॅट शतकावर शतक झळकावत होती. आता रोहित शर्मा कसोटीमध्ये सलामीला आला तेव्हा त्याने या प्राकारातही त्याने आपली छाप पाडण्यास सुरुवात केली आहे.

आयसीसी कसोटी क्रमवारीत रोहित शर्माने विराट कोहलीला मागे टाकले आहे. रोहित शर्मा सध्या कसोटी क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे. रोहीत १ सप्टेंबर २०१९ मध्ये टेस्ट रँकिंग ५३ व्या क्रमांकावर होता.

Back to top button