नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : बीसीसीआयचे अध्यक्षपद आता जय शहा यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा आहे. देशातील 15 राज्य संघटना त्यांना अध्यक्ष बनवण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे आता जय शहा हे बीसीसीआयचे अध्यक्ष होऊ शकतात. जर जय शहा हे अध्यक्ष झाले तर सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांचे काय होणार, हा प्रश्न बर्याच जणांना पडला आहे. पण या गोष्टीचे उत्तर आता समोर आले असून गांगुली यांचे आयसीसी अध्यक्षपदी प्रमोशन होऊ शकते.
बीसीसीआयला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला. त्यामुळे आता जय शहा आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) हे दोघेही बीसीसीआयमध्ये आपली दुसरी टर्म पूर्ण करू शकतात, पण आता गांगुली यांचे अध्यक्षपद जय शहा यांना देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. जर त्यांना बीसीसीआयमधील अध्यक्षपद मिळाले नाही तर ते बीसीसीआयमधील कोणतेही पद भूषवणार नाहीत.
गांगुली (Sourav Ganguly) यांना आता आयसीसीच्या अध्यक्षपदाची स्वप्न पडायला लागली आहेत आणि त्यांचे हे स्वप्न लवकरच साकार होऊ शकते. कारण आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ आता संपत आला आहे. त्यामुळे गांगुली आता थेट आयसीसीवर जाण्याच्या तयारीत आहेत.
सध्या ग्रेग ब्रॅकले आयसीसीचे अध्यक्ष असून त्यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. अलीकडेच, बर्मिंगहॅम येथील वार्षिक सर्वसाधारण सभेत, ब्रॅकेल यांनी आणखी दोन वर्षे पदावर राहण्याची इच्छा व्यक्त केली. बर्मिंगहॅम परिषदेदरम्यान नवीन अध्यक्षपदाची निवड करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली. आता अध्यक्ष निवडण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज नाही. नुकत्याच झालेल्या ठरावानुसार ५१ टक्के मते मिळवणारी व्यक्ती आयसीसी अध्यक्ष होऊ शकते. 16 सदस्यीय मंडळात अध्यक्ष होण्यासाठी इच्छीत उमेदवाराला फक्त नऊ मतांची गरज असते.
गांगुली आयसीसीचे अध्यक्ष बनले तर हे पद मिळवणारे ते पाचवे भारतीय असतील. त्यांच्या आधी एन. श्रीनिवासन, शशांक मनोहर यांनी हे पद भूषवले आहे. यांच्याशिवाय जगमोहन दालमिया आणि शरद पवार हे देखील आयसीसीचे अध्यक्ष राहिले आहेत.
15 राज्यांतील बोर्डांनी जय शहा यांना नवा अध्यक्ष करावे, असे मत व्यक्त केले आहे. अधिकतर सदस्यांच्या मते कोरोनाच्या काळात आयपीएलचे यशस्वी आयोजन करण्यात जय शहा यांचा मोठा वाटा होता. याचबरोबर आयपीएलच्या मीडिया राईटस्ने बोर्डाला 48 हजार 390 कोटी रुपयांची कमाई झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आता बीसीसीआयमध्ये निवडणुकीची तयारी सुरू आहे.
बोर्ड लवकरच वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवणार आहे. बोर्डाच्या घटनेत बदल झाल्यानंतर राज्य बोर्डांना नव्याने निवडणुकीसाठी नोटीस काढली जाईल. बीसीसीआयच्या विद्यमान अधिकार्यांचा 3 वर्षांचा कालावधी या महिन्यात पूर्ण होत आहे. यामुळेच पुन्हा निवडणूक होणार आहे.