ICC T20 Rankings : रिझवानने बाबरची ‘राजवट’ संपवली; ‘सुर्या’ला मोठे नुकसान | पुढारी

ICC T20 Rankings : रिझवानने बाबरची ‘राजवट’ संपवली; ‘सुर्या’ला मोठे नुकसान

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC T20 Rankings : यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया कप टी-20 स्पर्धेदरम्यान आयसीसीने (ICC) नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या क्रमवारीत मोठा बदल करण्यात झाला आहे. पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने आपला कर्णधार बाबर आझमची ‘राजवट’ संपुष्टात आणत अव्वल स्थान पटकावले आहे. रिजवान हा फक्त तिसरा पाकिस्तानी क्रिकेटर आहे जो नंबर वन टी-20 फलंदाज बनला आहे.

रिझवानला आशिया कपमधील कामगिरीचे बक्षीस

रिझवानला आशिया चषक स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीचे एकप्रकारे बक्षीसच मिळाल्याची चर्चा आहे. उजव्या हाताचा सलामीवीर रिझवान आशिया चषक 2022 मध्ये दोन अर्धशतकांसह सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने तीन सामन्यांत एकूण 192 धावा फटकावल्या आहेत. त्याने साखळी फेरीत हाँगकाँग विरुद्ध नाबाद 78 आणि सुपर 4 फेरीत भारताविरुद्ध 71 धावा काढून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे बाबर 1155 दिवस (7 सप्टेंबर 2022) नंबर वन फलंदाज राहिला पण आशिया कपमधील खराब कामगिरीमुळे त्याला अव्वल स्थान गमवावे लागले. रिझवानच्या खात्यात सध्या 815 तर, बाबर आझमच्या खात्यात 794 गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्कराम 792 गुणांसह तिसऱ्या आणि सूर्यकुमार यादव 775 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. (ICC T20 Rankings)

रोहित शर्माला फायदा तर सूर्यकुमार यादवला नुकसान

भारताचा कर्णधार रोहित शर्माने तीन स्थानांनी झेप घेतले असून तो 14व्या स्थानावर पोहोचला आहे. तर सूर्यकुमार यादवला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. त्याची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. पहिल्या दहाच्या यादीत सूर्या हा एकमेव भारतीय फलंदाज आहे.

चहल आणि अश्विनचा फायदा

गोलंदाजीत पहिल्या दहामध्ये तीन बदल करण्यात झाले आहेत. वेस्ट इंडिजचा फिरकीपटू अकिल हुसेन, अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान आणि श्रीलंकेचा महिष तेक्षाना यांनी प्रत्येकी एका स्थानाची प्रगती केली आहे. ते अनुक्रमे सहाव्या, सातव्या आणि आठव्या स्थानावर पोहोचले आहेत. भारताच्या युझवेंद्र चहलने तीन स्थानांनी प्रगती केली आहे. तो 24 व्या स्थानावर पोहोचला आहे. तर आर. अश्विनने 10 स्थानांनी झेप घेत अव्वल 50 मध्ये स्थान पटकावले आहे. (ICC T20 Rankings)

Back to top button