सूर्यकुमार यादव याचे शाहिद आफ्रिदीकडून कौतुक | पुढारी

सूर्यकुमार यादव याचे शाहिद आफ्रिदीकडून कौतुक

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हा भारताविषयी फारसा चांगले बोलत नाही; पण त्याने एका भारतीय खेळाडूचे विशेष कौतुक केले आहे. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीची फलंदाजी पाहण्यासाठी आपण खूप उत्सुक होतो, पण सामनावीर सूर्यकुमार यादव याची ताबडतोब फलंदाजी पाहून मला धक्‍का बसला, असे आफ्रिदीने म्हटले.

सूर्यकुमार यादवने हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात शानदार खेळी केली होती. अवघ्या 26 चेंडूंत 6 चौकार आणि 6 षटकारांच्या जोरावर त्याने 68 धावांची अर्धशतकी खेळी करून प्रतिस्पर्धी संघाला तगडे आव्हान दिले.

सध्या सर्वत्र आशिया चषकाची चर्चा रंगली आहे. अफगाणिस्तान, भारत आणि श्रीलंका या 3 संघांनी सुपर-4 फेरी गाठली आहे. शाहिद आफ्रिदीने समा टीव्हीशी संवाद साधताना म्हटले, मला थोडा वेळ मिळाला त्यामध्ये मी भारताचा सामना पाहिला. मी विराटची फलंदाजी पाहत बसलो होतो. त्याला धावा करण्यासाठी खूप वेळ लागत होता. हे त्याच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे त्याला देखील माहीत असून विराटला अशाच कामगिरीची गरज आहे. प्रतिस्पर्धी संघ कोणताही असला तरी त्याला पुढे जाण्यासाठी अशा खेळीची गरज आहे, त्यामुळे आत्मविश्‍वास मिळेल.

विराट खूप धिम्या गतीने खेळत राहिला; मात्र ज्या पद्धतीने सूर्यकुमारने खेळी करायला सुरुवात केली ती पाहता मला धक्‍काच बसला. त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला, तो सकारात्मक मानसिकतेतून आला होता. तो ठरवूनच आला होता की मला, कोणत्याही चेंडूवर मोठे फटकार मारायचे आहेत, अशा शब्दांत आफ्रिदीने सूर्यकुमार यादव याच्या खेळीचे कौतुक केले.

Back to top button