Asia Cup 2022 : बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघाने फक्त सामनाच नाही तर प्रेक्षकांचे ह्रदयही जिंकले | पुढारी

Asia Cup 2022 : बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघाने फक्त सामनाच नाही तर प्रेक्षकांचे ह्रदयही जिंकले

पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी मंगळवारी जबरदस्त खेळ दाखवत बांगला देशला हरवून आशिया चषकाच्या सुपर- 4 (Asia Cup 2022) मध्येही प्रवेश केला आहे. सामन्याच्या पहिल्या डावात फिरकीपटू मुजीब उर रहमान आणि राशिद खान चमकले, तर दुसऱ्या हाफमध्ये नजीबुल्ला जारदान आणि इब्राहिम जारदान यांनी धडाकेबाज खेळ केला.

अफगाणिस्तानने बांगलादेशला 7 बाद 127 धावांवर (Asia Cup 2022) रोखले होते आणि त्याचा पाठलाग करताना काही तरी सामना पाहायला मिळेल असे वाटत होते पण जारदानच्या जोडीने संपूर्ण सामना एकतर्फी केला, दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी नाबाद 69 धावा करत विजय मिळवून दिला. अफगाणिस्तान संघाने या सामन्यात केवळ विजय मिळवला नाही तर लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करण्यात यश मिळवले.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी व्हील चेअरवर बसलेल्या एका वृद्ध महिलेला भेटताना दिसत आहे. हा व्हिडिओ अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील शारजामध्ये झालेल्या सामन्याचा आहे.

कर्णधार मोहम्मद नबी याला खरं तर या सामन्यात गोलंदाजी व फलंदाजीमध्ये काही करता आले नाही. पण त्याने कर्णधार म्हणून संघाला खूप जबरदस्तपणे सांभाळले. त्याने पॉवर प्लेमध्ये फिरकी गोलंदाज लावून एक सट्टा खेळला व तो परफेक्ट लागला. त्याने आपले फिरकी गोलंदाज व जलदगती गोलंदाजांना चांगल्या पद्धतीने हातळले. त्याच्या या रणनीतीमुळे बांगलादेशला फारशा धावा घेता आल्या नाही. दुसरीकडे फलंदाजी अफगाणिस्तानला देखिल जड जाईल असे वाटत होते, कारण बांगलादेशकडे सुद्धा चांगले फिरकी गोलंदाज होते. पण, अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी चांगली व बचावात्मक खेळी करत विकेट्स न पडू देण्याचा पावित्रा घेतला. तसेच ते एका बाजूने धावा देखिल करत होते. अखेरच्या अर्थात १७ व्या आणि १८ व्या षटकात दोन्ही जारदानांनी स्फोटक फलंदाजी करत सामना कधी घेऊन गेले हे बांगला देशला सुद्धा कळाले नाही.

अफगाणिस्तानचा कर्णधार जितका सामन्यात आक्रमक वाटला तसा त्याने सामना जिंकल्या नंतरसुद्धा त्वेषाने आनंद साजरा केला. पण, त्यानंतर त्याने तितक्याच आदराने आपल्या विरोधी संघाचा सन्मान राखला व त्यांचा आदर केला. तसेच आपल्या पेक्षा दोन्ही बलाढ्य संघास धूळ चारत आशिया चषकात प्रथम सुपर – ४ मध्ये जाण्याची कामगिरी बजावली तरी त्याचा अह:म भाव त्याचाकडे नव्हता. अखेर त्याने मैदानात जात एका वृद्ध आणि व्हिलचेअरवर असलेल्या महिलेला त्याने भेट दिली व मोठ्या आदराने त्यांचा आशीर्वाद घेतला. त्या महिलेने सुद्धा त्याला जवळ घेत त्याचा डोक्यावरुन हात फिरवला. हा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

मॅचबद्दल बोलायचं झालं तर या मॅचमध्ये टॉस जिंकून बांगलादेशनं प्रथम बॅटिंग करण्‍याचा निर्णय घेतला होता, पण मॅचपूर्वी पॉवर प्लेमध्‍ये मॅच कोणत्या बाजूने जाणार हे कळत होतं. मुजीब उर रहमानने पहिल्या तीन षटकांत बांगलादेशच्या तीन फलंदाजांना बाद केले. शेवटी फलंदाजीमध्ये दोन्ही जारदान यांनी ६९ धावांची जलद खेळी करत अफगाणिस्तानला सुपर ४ मध्ये नेले.

Back to top button