चक्क लेहेंगा बटणांमध्ये लपवले ४१ लाख, दुबईला जाणाऱ्या प्रवाशाला दिल्ली विमानतळावर अटक (व्हिडिओ) | पुढारी

चक्क लेहेंगा बटणांमध्ये लपवले ४१ लाख, दुबईला जाणाऱ्या प्रवाशाला दिल्ली विमानतळावर अटक (व्हिडिओ)

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : दुबईला जाणार्‍या एका भारतीय प्रवाशाला मंगळवारी दिल्ली विमानतळावर सीआयएसएफच्या कर्मचार्‍यांनी मोठ्या रकमसेह पकडले. त्याने चक्क ‘लेहेंगा’ बटणांमध्ये ४१ लाख रुपये लपवले होते. सौदी रियालची तस्करी केल्याप्रकरणी त्याला अटक केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Indira Gandhi International airport) टर्मिनल-३ वर पहाटे ४ च्या सुमारास सुरक्षा तपासणीदरम्यान सदर व्यक्तीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अडवले होते. त्याच्या तपासणीत त्याच्याकडे मोठी रक्कम आढळून आली. या घटनेचा व्हिडिओ CISF ने त्यांच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केला आहे.

ड्युटीवर असलेल्या कर्मचार्‍यांनी एक्स-रे स्कॅनर मॉनिटरवर सदर प्रवाशांच्या बॅगेत ठेवलेल्या बटनांच्या आकाराच्या संशयास्पद वस्तू दिसून आल्या आणि त्यानंतर अधिक तपास करण्यात आला. या प्रवाशाला स्पाईसजेट विमानाने दुबईला जायचे होते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

१,८५,५०० सौदी रियाल त्याच्याकडे आढळून आले असून त्याची भारतीय चलनानुसार ४१ लाख किंमत आहे. लेहेंग्यामध्ये वापरल्या जाणार्‍या बटणाच्या मागे दुमडलेल्या चौकोनी आकारात ही रक्कम ही लपवण्यात आली होती. ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. लेहेंगा जरी महिलेचा असला तरी ही रक्कम एका पुरुषाकडे मिळाली आहे.

सदर प्रवाशाला विमानातून उतरवण्यात आले आणि पुढील तपासासाठी कस्टम अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Back to top button