IND vs Hong Kong : हाँगकाँगचा ‘कर्णधार’ पाकिस्तानी, तर ‘उपकर्णधार’ भारतीय | पुढारी

IND vs Hong Kong : हाँगकाँगचा ‘कर्णधार’ पाकिस्तानी, तर ‘उपकर्णधार’ भारतीय

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs Hong Kong : आशिया कप 2022 मध्ये भारताचा दुसरा सामना हाँगकाँग संघाशी आहे. क्रिकेट जगतात या संघाचे नाव क्वचितच ऐकायला मिळते. टीम इंडियाने हाँगकाँगविरुद्ध आतापर्यंत फक्त दोन वनडे सामने खेळले असून दोन्ही जिंकले आहेत. भारतीय संघ प्रथमच हाँगकाँगविरुद्ध टी-20 सामना खेळणार आहे. भारतासाठी हा सामना जिंकणे फारसे अवघड असणार नाही. मात्र, अनेक देशांतील खेळाडूंच्या समवेशामुळे हाँगकाँगचा संघ हा स्पर्धेतील वैविध्यपूर्ण ठरत आहे.

आशिया चषक स्पर्धेत एन्ट्री घेतलेल्या हाँगकाँग संघात स्थानिक खेळाडूंचा समावेश नाही. 17 सदस्यीय संघात 12 खेळाडू पाकिस्तानचे आहेत. चार खेळाडू भारताचे आहेत आणि एक खेळाडू इंग्लंडचा आहे. या संघातून खेळणाऱ्या खेळाडूंचे भारत आणि पाकिस्तानशी संबंध असले तरी त्यांचा बीसीसीआय किंवा पीसीबीशी संबंध नाही. (IND vs Hong Kong)

कर्णधार पाकिस्तानी आणि उपकर्णधार भारतीय

हाँगकाँग संघाचा कर्णधार निझाकत खान हा पाकिस्तानातील पंजाबचा आहे. त्यांचा जन्म अटक येथे झाला आहे. तर उपकर्णधार किंचित शाह भारताशी संबंधित आहे. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील मुंबई शहरात झाला आहे. याशिवाय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज स्कॉट मॅकेन्झी मूळचा इंग्लंडचा आहे. (IND vs Hong Kong)

चल तर जाणून घेऊया हाँगकाँगच्या संघातील कोणता खेळाडू कोणत्या देशाशी संबंधीत आहे….

यासीम मोर्तझा हा संघाचा सलामीवीर फलंदाज आहे. तो मूळचा पंजाब, पाकिस्तानातील आहे. त्याचा जन्म सियालकोट येथे झाला. हाँगकाँगचा कर्णधार निझाकत खान पाकिस्तानातील पंजाबचा आहे. त्यांचा जन्म अटक येथे झाला आहे. हाँगकाँगच्या सध्याच्या संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज बाबर हा सुद्धा पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील अटकचा आहे. एजाज खानचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला आहे. परंतु त्याचे पालक पाकिस्तानचे आहेत, जे नंतर हाँगकाँगमध्ये स्थायिक झाले. झीशान अली याचा जन्म पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोरमध्ये झाला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज हारून अर्शन हा पाकिस्तानी वंशाचा आहे. एहसान एहसान खानचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील रावळपिंडी येथे झाला आहे. यासह मोहम्मद गजनपार, वाजिद शाह, आफताब हुसेन, मोहम्मद वहीद, अतीक इकबाल हे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे आहेत. दरम्यान, भारतातील महत्त्वाचे शहर मुंबई येथे जन्मलेला किंचित शाह हाँगकाँगचा उपकर्णधार आहे. तसेच संघाचा वेगवान गोलंदाज आयुष शुक्ला, धनंजय राव, अहान त्रिवेदी हे भारतीय वंशाचा आहेत. संघाचा यष्टिरक्षक फलंदाज स्कॉट मॅकेन्झी हा इंग्लंडचा रहिवासी आहे. तो मँचेस्टर शहरातील आहे. मॅकेन्झीचा जन्म लँकेशायरमध्ये झाला.

Back to top button