रोहित शर्मा याला एमएस धोनी आणि मोईन खानला मागे टाकण्याची संधी | पुढारी

रोहित शर्मा याला एमएस धोनी आणि मोईन खानला मागे टाकण्याची संधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषक २०२२ मध्ये पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून दणदणीत विजय नोंदवला. आता टीम इंडिया बुधवारी (३१ ऑगस्ट) हाँगकाँग विरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला सुपर फोरमध्ये आपले स्थान पक्के करायचे आहे. हाँगकाँगला हरवून रोहित शर्मा आशिया चषकातील एक मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. रोहितला या सामन्यात माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी आणि विराट कोहलीला मागे टाकण्याची पुन्हा एकदा संधी आहे.

पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माने आशिया चषक स्पर्धेमध्ये कर्णधार म्हणून सलग सहाव्या विजयाची नोंद केली. यापूर्वी आशिया कपच्या इतिहासात एम. एस. धोनी आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार मोईन खान यांच्या नावावर सलग ६ सामने जिंकण्याचा विक्रम आहे.

रोहित शर्माला आशिया कपमध्ये नवा विक्रम करण्याची संधी आहे. रोहित शर्मा आशिया कपमध्ये सलग ७ सामने जिंकणारा कर्णधार बनू शकतो. रोहित शर्माने कर्णधार म्हणून आशिया चषकातही सलग ६ सामने जिंकले आहेत आणि जर टीम इंडिया हाँगकाँग विरुद्धचा सामना जिंकला तर रोहित सलग ७ सामने जिंकणारा कर्णधार बनेल. रोहित शर्मा हा सामना जिंकून एम. एस. धोनी आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार मोईन खान यांचा विक्रम आपल्या नावावर करेल.

आशिया चषक २०१८ मध्ये भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सलग पाच सामने जिंकले हे लक्षात घेण्यासारखे आहे. फक्त अफगाणिस्तानविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. एमएस धोनीने या सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते.

विराटचा विक्रम मोडण्याची संधी

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत 36 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाचा फक्त 6 वेळा पराभव झाला आहे, तर 30 वेळा भारताने विजय मिळवला आहे. दुसरीकडे विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर कोहलीने कर्णधार म्हणून भारतासाठी 50 पैकी 30 सामने जिंकले आहेत. जर रोहित उद्या विजयाची नोंद करण्यात यशस्वी झाला तर तो T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार बनेल. एक कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. या माजी कर्णधाराच्या नेतृत्वाखाली भारताने 72 पैकी 41 सामने जिंकले आहेत.

Back to top button