Ind Vs Pak Asia Cup : भारत आणि पाकिस्‍तान पुन्‍हा येणार आमने-सामने? जाणून घ्‍या, कसे असेल समीकरण | पुढारी

Ind Vs Pak Asia Cup : भारत आणि पाकिस्‍तान पुन्‍हा येणार आमने-सामने? जाणून घ्‍या, कसे असेल समीकरण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत विरुद्‍ध पाकिस्‍तान सामना क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असतो. हे दोन्‍ही संघ आमने-सामने आले की, क्रिकेटप्रेमींवर थरार, उत्‍कंठा आणि रोमहर्षक क्षणांची बरसातच होते . हे सारे भारतीय क्रिकेट रसिकांनी ( Ind Vs Pak Asia Cup ) एका दिवसांपूर्वीच म्‍हणजे रविवारी ( दि. २८)  अनुभवलं. आता आशिया चषक स्‍पर्धेत अंतिम सामन्यापूर्वी पुन्‍हा एकदा हे दोन्‍ही संघ आमने-सामने येतील, अशी समीकरणे घडतील असे मानले जात आहे. जाणून घेवूया याविषयी…

आशिया चषक स्‍पर्धेतील पहिल्‍याच सामन्‍यात टीम इंडियाने पाकिस्‍तानचा धुव्‍वा उडवला. शेवटच्‍या षटकापर्यंत उत्‍कंठा वाढविणारा हा सामना भारताने पाच गडी राखून जिंकला. तब्‍बल १० महिन्‍यांनंतर दोन्‍ही संघांमधील सामना क्रिकेटप्रेमींसाठी खास ठरला. आशिया चषक स्‍पर्धेत एकुण ६ संघ सहभागी झाले आहेत. ३-३ अशा दोन ग्रुपमध्‍ये त्‍यांची विभागणी आहे. ग्रुप-एमध्‍ये भारत, पाकिस्‍तान आणि हॉगकाँगचा समावेश आहे. तर ग्रुप-बीमध्‍ये अफगाणिस्‍तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघाचा समावेश आहे. पहिला सामना जिंकल्‍याने ग्रुप-एमध्‍ये भारत प्रथम क्रमांकावर आहे. तर पाकिस्‍तान आणि हॉगकाँग हे अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या स्‍थानी आहेत.

Ind Vs Pak Asia Cup : असे असेल समीकर‍ण…

आता भारत आणि पाकिस्‍तान संघाचे पुढील सामना हा हॉगकाँगबरोबर होणार आहे. या दोन संघांसमोर हॉगकाँगचा संघ कमकुवत आहे. त्‍यामुळे हे दोन्‍ही संघ आपले सामने जिंकतील आणि ग्रुप-एमध्‍ये भारत प्रथम तर पाकिस्‍तान दुसर्‍या स्‍थानावर राहील, असे मानले जात आहे.

केव्‍हा होईल सामना?

साखळी सामन्‍यानंतर आशिया चषक स्‍पर्धेत सुपर-4चा टप्‍पा सुरु होईल. यास दोन्‍ही ग्रुपमधील टॉप-२ संघांमध्‍ये सामने होतील. पाकिस्‍तान सुपर-४मध्‍ये आले तर रविवार, ४ सप्‍टेंबर रोजी पुन्‍हा एकदा भारत-पाकिस्‍तान महामुकाबला पाहण्‍यास मिळेल. तसेच बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्‍तान या तीन संघांपैकी जे दोन संघ सुपर-४मध्‍ये जातील. त्‍यांच्‍याशी भारताचे सामने होतील. सुपर-४मधील विजयावरच भारताचा अंतिम सामन्‍यातील प्रवेश निश्‍चित होणार आहे. भारत आणि पाकिस्‍तान यांनी सुपर-४मध्‍ये आपले सामने जिंकल्‍यास दोन्‍ही संघ अंतिम सामन्‍यासाठी भिडतील. आणि हा सामना रविवार, ११ सप्‍टेंबर रोजी होईल.

पहिल्‍याच सामन्‍यात भारताची दमदार कामगिरी

आशिया चषक स्‍पर्धेतील पहिल्‍याच सामन्‍यात भारताने दमदार कामगिरी करत पाकिस्‍तानचा ५ गडी राखून पराभव केला होता. पाकिस्‍तानने प्रथम फलंदाजी करताना १४७ धावा केल्‍या. पाकिस्‍तानचा फलंदाज मोहम्‍मद रिजवान याने सर्वाधिक ४७ धावा केल्‍या होत्‍या. भारताने २०व्‍या षटकात हे टार्गेट पाच गडी राखून पूर्ण केले. अष्‍टपैलू हार्दिक पंड्या याने केलेल्‍या दमदार फलंदाजीच्‍या जोरावर भारताचा विजय सुकर झाला होता. त्‍याने गोलंदाजी करताना तीन बळी घेतले तर १७ चेंडूमध्‍ये ३३ धावांची खेळी केली होती. हार्दिकने षटकार मारत भारताचा विजय निश्‍चित केला आणि कोट्यवधी देशवासीयांसाठी तो हिरो ठरला.

हेही वाचा : 

 

Back to top button