Asia cup 2022 : पाकिस्तानविरुद्ध भारताच्या वेगवान गोलंदाजांनी पहिल्यांदाच केली ‘हि’ माेठी कामगिरी | पुढारी

Asia cup 2022 : पाकिस्तानविरुद्ध भारताच्या वेगवान गोलंदाजांनी पहिल्यांदाच केली ‘हि’ माेठी कामगिरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान (Asia cup 2022) यांच्यात आशिया चषकातील (Asia Cup 2022) दुसरा टी-20 सामना झाला. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या कडक गोलंदाजीपुुढे पाकिस्तानच्या फलंदाजीने नांगी टाकली. त्यांचा संपूर्ण डाव १९.५ षटकांत १४७ धावांत संपला. या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी माेठी कामगिरी केली आहे.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारत तीन वेगवान गोलंदाज घेऊन उतरला. भारतीय संघात आवेश खान, भुवनेश्‍वर कुमार आणि अर्शदीप सिंग हे तीन वेगवान गोलंदाज खेळले. याचबरोबर ऋषभ पंतच्या जागी अनुभवी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली.

या सामन्यात भारतीय  वेगवान गोलंदाजांनी पाकिस्तानच्या सर्वच (१० विकेट) विकेट घेतल्या. पहिल्यांदाच अशी कामगिरी भारताच्या वेगवान गोलंदाजांनी केली आहे. भुवनेश्‍वर कुमारने २० धावांत ४ तर हार्दिक पंड्याने २५ धावांत ३ विकेटस् घेऊन मोठी धावसंख्या उभारण्याच्या पाकिस्तानच्या स्वप्नांना सुरुंग लावला.  अर्शदीप सिंहने दोन विकेट्स तर आवेश खानने एक विकेट घेत त्यांना माेलाची साथ दिली. यापूर्वी वेस्ट इंडीजविरुद्ध टी-२० सामन्यात भारताच्या फिरकीपटूंनी १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.

पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 43 धावा केल्या. पहिल्याच षटकातच सामन्याचा रोमांच पाहायला मिळाला. भुवनेश्‍वरचे षटक चांगलेच धडधड वाढवणारे ठरले. त्याच्या दुसर्‍याच चेेंडूवर मोहम्मद रिझवानला पायचित देण्यात आले होते, मात्र पाकिस्तानचा रिव्ह्यू यशस्वी ठरला आणि रिझवान बचावला. तर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर भारताने यष्टिमागे झेलासाठी रिव्ह्यू घेतला मात्र तो अयशस्वी ठरला.

आशिया चषकातील आजच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ६ विकेट्सने विजय मिळवला. रविंद्र जडेजा आणि विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला गेला. विराट कोहलीने ३ चौकार आणि १ षटकार लगावत ३४ चेंडूमध्ये ३५ धावांची खेळी केली. तर रविंद्र जडेजाने २ चौकार आणि २ षटकार लगावत २८ चेंडूमध्ये ३५ धावांची खेळी केली. विराट कोहलीच्या या दमदार खेळीच्या बळावर भारताने हा विजय संपादन केला.

 

Back to top button