IND vs PAK T20 Asia Cup 2022 : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माला ‘हा’ विक्रम करण्‍याची संधी | पुढारी

IND vs PAK T20 Asia Cup 2022 : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माला 'हा' विक्रम करण्‍याची संधी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आशिया चषक स्पर्धेत टीम इंडिया आज पाकिस्तानशी भिडणार आहे. हा सामना कर्णधार रोहित शर्मा यांच्‍यासाठी खास ठरण्‍याची शक्‍यता आहे. या सामन्‍यात रोहितने ११ धावा केल्‍या तर तो टी-२० फॉर्मेटमधील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरणार आहे. त्‍यामुळेच सर्वांचे लक्ष रोहित शर्माच्‍या खेळीकडे वेधले आहे.

भारताचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा याने आजच्‍या सामन्‍यात ११ धावा केल्‍या तर तो न्‍यूझीलंडच्‍या मार्टिन गुप्‍टिल यांचा विक्रम मोडेल. गुप्‍टिल याने टी-२० फॉर्मेटमध्‍ये आतापर्यंत सर्वाधिक ३४९७ धावा केल्‍या आहेत. तर रोहित शर्मा याच्‍या नावावर ३ हजार ४८७ धावा आहेत. तिसर्‍या स्‍थानावर विराट कोहली असून त्‍याने या फॉर्मेटमध्‍ये आतापर्यंत ३ हजार ३०८ धावा केल्‍या आहेत.

IND vs PAK T20 Asia Cup 2022 : विराट कोहलीसाठीही ठरणार ‘खास’ सामना

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा आजचा टी-२० मधील शंभरावा सामना असेल. या सामन्यासह प्रत्येक फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 99 टी-20 सामन्यांव्यतिरिक्‍त 102 कसोटी आणि 262 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

IND vs PAK T20 Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेत भारतच सरस

आशिया चषकांत आतापर्यंत भारत-विरुद्ध पाकिस्तान असे 14 सामने झाले असून, यात 8 सामने भारताने, तर 5 सामने पाकिस्तानने जिंकले होते. एक सामना अनिर्णीत राहिला आहे. भारताने आजवर 7 वेळा, तर पाकिस्तानने दोनवेळा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. यंदा आशिया चषकात भारत आठव्यांदा चषक मायदेशी परत आणण्यासाठी सज्ज आहे.

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी सहसा पाटा खेळपट्टी म्हणून ओळखली जाते. मात्र, दोन ते तीन सलग सामने झाल्यानंतर खेळपट्टीवर अतिरिक्‍त उसळी आणि चेंडू जास्त सीम होण्यास सुरुवात होते. मात्र, पहिले काही सामने हे जास्त धावसंख्येचे होतील, असा अंदाज आहे. गोलंदाजांच्या द‍ृष्टिकोनातून पाहावयाचे झाले, तर 180 आणि 190 धावांचे टार्गेटदेखील या स्टेडियमवर सेफ टार्गेट नाही. दुबईत नाणेफेकीला जास्त महत्त्व आहे. जो टॉस जिंकेल, तो सामना जिंकेल, असे गेल्या काही सामन्यांवरून दिसते.

हेही वाचा : 

 

 

Back to top button