Asia Cup IND vs PAK : विराट-रोहित नाही तर ‘हे’ तीन खेळाडू ठरणार ‘गेमचेंजर’!

Asia Cup IND vs PAK : विराट-रोहित नाही तर ‘हे’ तीन खेळाडू ठरणार ‘गेमचेंजर’!

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात चाहत्यांसह खेळाडूंवर एकप्रकारचे दडपण असते. पण हा सामना म्हणजे खेळाडूंना हिरो बनण्याची संधी असते. या क्रिकेट महामुकाबल्यात चांगली कामगिरी करणारा खेळाडू पुढील अनेक वर्षे स्मरणात राहतो. यावेळीही असे अनेक स्टार्स दोन्ही संघांकडून मैदानात उतरणार आहेत. त्या सर्वांकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. त्यातही टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याव्यतिरिक्त तीन खेळाडू असे आहेत जे गेमचेंजर ठरतील.

1. सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादवची गणना अशा खेळाडूंमध्ये केली जाते, ज्यांच्यासाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी सोशल मीडियावर दीर्घ मोहीम सुरू होती. आयपीएलच्या 123 सामन्यांमध्ये 136 च्या स्ट्राईक रेटने 2644 धावा केल्यानंतर सूर्याची अखेर टीम इंडियामध्ये निवड झाली. आशिया कपमध्ये सूर्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी सांभाळेल. त्याने भारतासाठी 23 टी-20 सामन्यांमध्ये 175.45 च्या स्ट्राइक रेटने 672 धावा केल्या आहेत.

सुर्याची खेळण्याची शैली वैविध्यपूर्ण आहे. त्यामुळे त्याला भारताचा मिस्टर 360 डिग्री खेळाडू म्हटले जात आहे. गोलंदाजाने बचावासाठी चेंडू पायाभोवती टाकला तरी सूर्या तो सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यास मागेपुढे पाहत नाही. त्याचे ऑफसाइडपासून ते लेग साईडपर्यंतचे फटके प्रतिस्पर्धी गोलंदाजांना हतबल करतात. टी20 विश्वचषक 2021 मध्ये सलामीची जोडी स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर टीम इंडिया कधीही पुनरागमन करताना दिसली नाही. यावेळी जर अशी परिस्थिती उद्भवली तर चाहते फार लवकर आशा सोडणार नाहीत कारण दुबईच्या मैदानात 'सुर्य' तळपणार याची सर्वांना खात्री आहे.

2. युझवेंद्र चहल

युझवेंद्र चहलला टी-20 वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली नाही. त्यावेळी निवडकर्त्यांना नव्या कॉम्बिनेशनसोबत जायचे असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यावेळी निवडकर्त्यांकडून एक स्टेटमेंट देण्यात आले होते की, आम्हाला वेगवान फिरकीपटू हवे आहेत. म्हणजे एक गोलंदाज जो स्पिनर असतानाही त्याच्या वेगवान चेंडूंनी फलंदाजाला त्रास देऊ शकेल.

या वेगवान स्पिनरची संकल्पना ऐकून क्रिकेट चाहत्यांनाही आश्चर्य वाटले. त्याचबरोबर ती बाब चहलला खोलवर भिडली. 2021 च्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाच्या खराब कामगिरीदरम्यान चहलने स्वतःवर काम करणे सुरू ठेवले. त्याचा चांगला परिणाम असा झाला की, आयपीएल 2022 च्या 17 सामन्यात त्याने 27 विकेट घेतल्या. जगभरातील दिग्गज गोलंदाजांना मागे टाकल्यानंतर निवडकर्त्यांचे लक्ष आपोआपच चहलकडे गेले. अखेर त्याचे टीम इंडियात पुरागमन झाले. आता तो दुबईच्या मैदानावर प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांना आपल्या फिरकीने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवण्यास सज्ज झाला आहे.

3. हार्दिक पंड्या

अष्टपैलू हार्दिक पंड्या भारतीय संघात गोलंदाजीतील कमतरता भरून काढतो. तर आक्रमक फलंदाजीने तो मधल्या फळीत संघाचा डाव सावरू शकतो. संघाची शीर्ष फळी अपयशी ठरली तरी, हार्दिककडे स्वबळावर विजय मिळवण्याची क्षमता आहे. तो डेथ ओव्हर्समध्ये पॉवर हिटिंगही करू शकतो. हार्दिकने इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पहिल्या टी-20 सामन्यातही त्याने 51 धावांची इनिंग खेळली आणि चार विकेट्सही घेतल्या.

पाठीची दुखापतीने त्रस्त असताना त्याला गोलंदाजी करता येत नव्हती. तरीही त्याला टी 20 विश्वचषक स्पर्धेत संधी देण्यात आली पण नंतर त्याला वगळले. त्यानंतर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सनेही त्याला संघात कायम ठेवले नाही. पण तो ड्गमगला नाही. हार्दिकने आपल्या फिटनेसमध्ये सुधारणा केली. तो सावरला आणि मैदानात परतला. पाठीच्या दुखापतीतून परत आल्यापासून तो एकामागून एक चमत्कार करत आहे. प्रथम, त्याने IPL-2022 मध्ये गुजरात टायटन्स या नवोदित संघाचा कर्णधार बनत या नव्या संघाला पहिल्याच प्रयत्नात विजेतेपद मिळवून दिले. त्यानंतर आपसूकच त्याला पुन्हा टीम इंडियाचे दरावाजे खुले झाले. निळ्या जर्सीत खेळताना त्याने एकापाठोपाठ एक मॅचविनिंग खेळी करून भारताला विजय मिळवून दिले. या आशिया कपमध्ये संघाला त्याच्याकडून मोठ्या आशा आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news