Asia Cup IND vs PAK: रोहित शर्माने पाकिस्तान विरुद्ध टॉस जिंकला तर... | पुढारी

Asia Cup IND vs PAK: रोहित शर्माने पाकिस्तान विरुद्ध टॉस जिंकला तर...

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asia Cup IND vs PAK : आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यासाठी आता काही मोजकेच दिवस शिल्लक आहेत. स्पर्धेच्या दुस-या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. या सामन्याची जगभरात उत्सुकता असून चाहते चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ या सामन्यासाठी जोरदार तयारी करत आहेत.

टी 20 विश्वचषक 2021 (T 20 World Cup 2021) नंतर सुमारे दहा महिन्यांनंतर भारत-पाकिस्तान (IND vs PAK) संघ आमनेसामने आहेत. विशेष म्हणजे दहा महिन्यांपूर्वी ज्या मैदानावर पाकिस्तानी संघाने टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला होता, त्याच मैदानावर म्हणजेच दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आशिया चषक (Asia Cup 2022) स्पर्धेतील सामना होत आहे. त्यामुळे या अतिशय महत्त्वपूर्ण अशा सामन्याच्या ‘टॉस’कडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. (Asia Cup IND vs PAK)

धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया पटाईत…

आशिया चषक (Asia Cup 2022) स्पर्धेबाबत बोलायचे झाल्यास भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 14 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी टीम इंडियाने (Team India) 8 सामने जिंकले असून, पाकिस्तानला पाच सामन्यत विजय मिळवता आला आहे. तर एक सामना रद्द झाला आहे. त्यामुळे आकडेवारीचा विचार केल्यास आशिया स्पर्धेत टीम इंडियाचे पाकिस्तानविरुद्ध पारडे जड आहे. टीम इंडियाने आठ सामन्यांपैकी सहा सामन्यांत धावांचा पाठलाग करून पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे भारताने धावांचा पाठलाग करताना म्हणजेच दुस-यांदा फलंदाजी केल्यावर मिळवलेल्या विजयाची टक्केवारी जास्त आहे. (Asia Cup IND vs PAK)

दुसरीकडे, पाकिस्तानने जे पाच सामने जिंकले आहेत त्यातील चार सामन्यांत पहिला फलंदाजी करताना भारताला मात दिली आहे. तर केवळ एकदाच धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला आहे. म्हणजेच, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केल्यावर विजयाची टक्केवारी जास्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्याचबरोबर धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने अधिक सामने जिंकले आहेत. म्हणजेच 28 ऑगस्टला जेव्हा भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम टॉससाठी येतील तेव्हा त्यांच्या मनात हे आकडे नक्कीच असतील आणि जो कर्णधार टॉस जिंकेल, तो त्यानुसार निर्णय घेईल, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात आतापर्यंत झालेल्या टी-20 सामन्यांचे आकडे काय आहेत, हेही माहिती असणे आवश्यक आहे. कारण यंदाचा आशिया चषक टी-20 फॉर्मेटमध्ये खेळला जात आहे. टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, भारत आणि पाकिस्तान नऊ सामन्यांमध्ये आमने-सामने आले आहेत, त्यापैकी सात सामन्यात भारत जिंकला असून पाकिस्तानला केवळ दोन सामन्यात विजय मिळवता आला आहे. या दोन सामन्यांपैकी एक सामना मागील वर्षी 2021 च्या विश्वचषक स्पर्धेत खेळला गेला होता ज्यात बाबर आझमच्या पाक संघाने दहा विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्या सामन्याच्या कटू आठवणी अजूनही ताज्या आहेत आणि यावेळी भारतीय संघ त्या पराभवाचा बदला नक्कीच घेतील अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे.

Asia Cup : वासीम आक्रमने सांगितली पाकिस्‍तान संघाची कमकुवत बाजू, म्‍हणाला, “गोलंदाजीत नाही… “

Back to top button