Asia Cup 2022 : पाकविरुद्ध मैदानात उतरताच विराट कोहली ठरणार ‘शतकवीर’! | पुढारी

Asia Cup 2022 : पाकविरुद्ध मैदानात उतरताच विराट कोहली ठरणार ‘शतकवीर’!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asia Cup 2022 : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली खराब फॉर्मशी झुंज देत असूनही आगामी आशिया कप 2022 मध्ये एक मोठा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. भारतीय संघ रविवारी (28 ऑगस्ट) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करेल, तेव्हा विराट त्याच्या कारकिर्दीत आणखी एक नवा इतिहास रचेल. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 100 सामने पूर्ण करेल.

अलीकडच्या काळात फॉर्मात नसलेला कोहली जवळपास महिनाभरानंतर मैदानात परतणार आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर कोहलीला वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली होती. माजी कर्णधार कोहली आता आशिया कपमधून भारतीय संघात पुनरागमन करत आहे. 33 वर्षीय कोहली T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 सामने पूर्ण करणारा 14 वा क्रिकेटपटू ठरणार आहे. विराटने आतापर्यंत 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 50.12 च्या सरासरीने 3308 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या नावावर 30 अर्धशतकांची नोंद आहे. (Asia Cup 2022)

भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. रोहितने आतापर्यंत 132 टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्यानंतर, पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने 124 आणि न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने आतापर्यंत 121 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Back to top button