

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC ODI Rankings : भारताने झिम्बाब्वेविरुद्धची वनडे मालिका 3-0 अशा फरकाने जिंकून आयसीसी क्रमवारीत आपले स्थान मजबूत केले. भारताचे सध्या 111 रेटिंग गुण झाले आहेत आणि ते चौथ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानपेक्षा चार गुणांनी पुढे आहे. मात्र, पाकिस्तानने नेदरलँड्सचा 3-0 अशा फरकाने पराभव करत 107 रेटिंग गुण मिळवले. न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. किवी संघाने वेस्ट इंडिजचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. न्यूझीलंडचे 124 रेटिंग गुण आहेत.
इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानावर असून त्यांचे 119 रेटिंग गुण आहेत. मात्र, सध्याच्या घडीला दुसऱ्या क्रमांकाच्या संघाला मागे टाकणे भारतासाठी सोपे जाणार नाही. आता भारतीय संघ ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिके विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत चांगली कामगिरी करून भारत आपली स्थिती आणखी सुधारू शकतो.
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. दरम्यान, द. आफ्रिकेने यजमान इंग्लिश संघाविरुद्धच्या वनडे मालिकेत चांगली कामगिरी करणे अपेक्षित आहे. जेणे करून आफ्रिकन संघाचे गुण वाढतील आणि दुसरीकडे इंग्लंडचे गुण कमी होतील. यानंतर ऑक्टोबरमध्ये होणा-या वनडे मालिकेत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यास मेन इन ब्ल्यू संघाची स्थिती मजबूत होईल. त्याचबरोबर पाकिस्तानचा संघ अगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर एकदिवसीय सामने खेळणार आहे. पाकिस्तानसाठी ऑस्ट्रेलियात विजय मिळवणे सोपे नसेल. अशा परिस्थितीत टीम इंडिया पाकिस्तानच्या मागे पडेल हा धोका जवळपास संपुष्टात आला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील एका सामन्यात न्यूझीलंडचा पराभव झाला होता. न्यूझीलंडने ती मालिका 3-0 ने जिंकली असती तर त्यांचे नऊ गुण झाले असते, परंतु एक सामना गमावल्यामुळे त्यांचे केवळ पाच गुण झाले आहेत. किवी संघाला आता ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकून आपले स्थान मजबूत करण्याची संधी असेल. त्याचबरोबर मालिका गमावल्यास न्यूझीलंड प्रथम स्थान गमावेल आणि इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानावर पोहोचेल. झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका विजयासह ऑस्ट्रेलिया पाकिस्तानला हरवून चौथ्या स्थानावर येऊ शकतो.
ऑस्ट्रेलिया (101) पाचव्या, दक्षिण आफ्रिका (101) सहाव्या, बांगलादेश (92) सातव्या, श्रीलंका (92) आठव्या, वेस्ट इंडिज (71) नवव्या, अफगाणिस्तान (69) दहाव्या स्थानावर आहेत.