पॅरालिम्पिक : सुमित अंतिल याची भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी | पुढारी

पॅरालिम्पिक : सुमित अंतिल याची भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी

टोकियो; पुढारी ऑनलाईन : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची धडाकेबाज कामगिरी सुरूच आहे. सोमवारी भालाफेक स्पर्धेच्या एफ ६४ (F64) क्लास इव्हेंटमध्ये सुमित अंतिल याने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. पॅरालिम्पिकमधील हे भारताचं दुसरं सुवर्णपदक असून आज सकाळीच महिला नेमबाज अवनी लेखराने महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

सुमित आंतिलच्या या मेडलसह आता टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात ७ मेडल झाली आहेत. भालाफेक स्पर्धेतच भारताला तीन मेडल मिळाली आहेत. भालाफेकमध्ये देवेंद्र झझारियाला रौप्य पदक, भालाफेकमध्येच सुंदर सिंगला कांस्य पदक मिळाले.

सुमीतने सुवर्ण पदकावर नाव कोरत दोन विश्वविक्रमीही केले. त्याने ६८.५५ मीटरचा थ्रो सगळ्यात लांब होता. या स्पर्धेत त्याने एक-दोनदा नाही तर तीन वेळेला स्वत:चा जागतिक विक्रम मोडला.

सुमीतने स्पर्धेत सहा प्रयत्नातील पहिला थ्रो ६६.९५ मीटर लांब फेकला. या थ्रोसह त्याने २०१९ मध्ये दुबईत बनवलेले स्वत:चा विक्रम मोडला. दुसरा थ्रो त्याने ६८.०८ मीटर लांब फेकला. त्यानंतरचा तिसरा आणि चौथा थ्रो फारसा काही चांगला गेला नाही. सुमीतने पाचवा थ्रो ६८.५५ मीटरचा लांब फेकला याबरोबरच त्याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

हरियाणाच्या सोनीपत येथील सुमितचा प्रवास अडचणींनी भरलेला आहे. ६ वर्षांपूर्वी झालेल्या रस्ते अपघातात एक पाय गमावल्यानंतरही, सुमितने आयुष्यात कधीही हार मानली नाही आणि प्रत्येक परिस्थितीचा मोठ्या धैर्याने सामना केला.

भारताने आतापर्यंत पॅरालिम्पिकमध्ये २ सुवर्ण, ४ रौप्य आणि १ कांस्यपदकांसह ७ पदके जिंकली आहेत. हे भारताचे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी पॅरालिम्पिक ठरले आहे. यापूर्वी भारताने २०१६ च्या रिओ पारालिम्पिक आणि १९८४ च्या पारालिम्पिक ४-४ पदके जिंकली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

टोकियो पॅरालिम्पिकमधलं भारताचं एक पदक रद्द करण्यात आलं. डिस्कस थ्रोमध्ये विनोद कुमार याला रविवारी कांस्य पदक मिळालं होतं. विनोद कुमारचं मेडल क्लासिफिकेशन समितीने रद्दबातल ठरवलं आहे.

Back to top button