44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : तानिया सचदेवमुळे भारताची हंगेरीवर मात | पुढारी

44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : तानिया सचदेवमुळे भारताची हंगेरीवर मात

मामल्लापूरम; वृत्तसंस्था : 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत तानिया सचदेव हिने सोका गॉल हिला चौथ्या फेरीत हरवल्यामुळे भारताला हंगेरीवर 2.5-1.5 असा विजय मिळवता आला. तामिळनाडूच्या मामल्लापूरम येथे ही स्पर्धा सुरू असून सोमवारी स्पर्धेचा सहावा दिवस होता. तानियाच्या सामन्यापूर्वी भारताच्या कोनेरू हंपी, ड्रोनावल्ली हरिका आणि आर. वैशाली यांचे सामने बरोबरीत सुटले होते. त्यामुळे हंगेरीविरुद्धच्या लढतीचा निकाल तानियाच्या सामन्यावर अवलंबून होता. दरम्यान, या स्पर्धेत आघाडीवर असलेल्या अमेरिकेला उझबेकिस्तानने 2-2 असे बरोबरीत रोखले.

सोमवारच्या एका महत्त्वपूर्ण सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसन याने मंगोलियाच्या डी. बॅटसुरेन याच्यावर 30 व्या चालीनंतर विजय मिळवला. कार्लसनला रविवारी बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर त्याने आपल्या कामगिरीत सुधारणा करीत विजय मिळवला. भारताच्या युवा संघाने पुन्हा एकदा दिमाखदार कामगिरी करताना इटलीवर 3-1 असा विजय मिळवला, पण खुल्या गटात भारत आणि इटली यांची 2-2 अशी बरोबरी झाली. एस. एल. नारायण आणि मॅक्सिम लाग्रेड यांचा सामना अनिर्णीत राहिला.

महिला गटात भारताच्या तिसर्‍या संघाला जॉर्जियापुढे 3-1 अशी हार पत्करावी लागली. पी. व्ही. नंधिदा हिने हा एकमेव विजय भारताला मिळवून दिला. तत्पूर्वी, रविवारी भारताचे सर्वच्या सर्व सहा संघ मैदानात उतरले होते व त्यांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेत आगेकूच केली. भारत ‘अ’ संघाने दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या ग्रीसचा 3-1 गुणांसह पराभव केला, तर संघ ‘क’ ने आईसलँडचा 3-1 असा पराभव केला. दुसरीकडे, भारतीय महिलांनीही तिसर्‍या फेरीतील सर्व सामने जिंकून अचूक गुण मिळवले. भारत महिला ‘अ’ने इंग्लंडचा 3-1, भारत ‘ब’ने इंडोनेशियावर 3-1 आणि भारत ‘क’ने ऑस्ट्रियावर 2.5-1.5 अशा फरकाने मात दिली.

Back to top button