टीम इंडियाला मिळेना अमेरिकेचा व्हिसा! विंडीजविरुद्धच्या सामन्यांबाबत सस्पेंस वाढला | पुढारी

टीम इंडियाला मिळेना अमेरिकेचा व्हिसा! विंडीजविरुद्धच्या सामन्यांबाबत सस्पेंस वाढला

पुढारी ऑनलाईन डेस्क : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या विंडीजविरुद्ध पाच सामन्यांची T20I मालिका खेळत आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेत होणार आहेत, ज्याबाबत आता अनिश्चिततेचे ढग दाटून आले आहेत. व्हिसाच्या अडचणींमुळे आता हे सामने कॅरेबियन मैदानावरच होतील अशी शक्यता आहे. कॅरेबियन क्रिकेट बोर्डही याबाबत सकारात्मक असल्याची चर्चा आहे. (india vs west indies t20)

क्रिकबझच्या वृत्तानुसार, टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजला या दोन्ही संघांना अमेरिकेचा व्हिसा मिळालेला नाही. त्यामुळे क्रिकेट वेस्ट इंडिजला पर्यायी योजना आखावी लागली आहे. हे दोन्ही सामने 6 आणि 7 ऑगस्ट रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होणार आहेत. पण दोन्ही संघातील अनेक खेळाडूंना अमेरिकेचा व्हिसा मिळालेला नाही. (india vs west indies t20)

एका सूत्राच्या माहितीनुसार, व्हिसा समस्येचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. हे सामने वेस्ट इंडिजमध्येही होऊ शकतात. पण सेंट किट्समध्ये व्हिसा दिला जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. अशी शक्यता आहे की खेळाडूंना प्रवासाच्या कागदपत्रांसाठी त्रिनिदादला परत जावे लागेल जेथून ते मंजूर झाल्यास ते अमेरिकेला जातील.

आज दुसरा T20 सामना

दुसरीकडे, भारत आणि विंडीज यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज (1 ऑगस्ट) वॉर्नर पार्क, सेंट किट्स आणि नेव्हिस येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने यजमान संघाचा 68 धावांनी पराभव केला होता. अशा परिस्थितीत आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया दुसराही सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याचे अटोकाट प्रयत्न करेल. दुसरीकडे, निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली विंडीजचा संघ मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.

विंडीजविरुद्ध T20I मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, संजू सॅमसन, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, भुवनेश यादव, खान, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग.

Back to top button