ICC ODI Rankings मध्ये हार्दिक पंड्याचा जलवा! थेट टॉप-10 अष्टपैलूंमध्ये एन्ट्री | पुढारी

ICC ODI Rankings मध्ये हार्दिक पंड्याचा जलवा! थेट टॉप-10 अष्टपैलूंमध्ये एन्ट्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या हार्दिक पंड्याने आयसीसीच्या ताज्या वनडे क्रमवारीत (ICC ODI Rankings) मोठी झेप घेतली असून तो अष्टपैलूंच्या यादीत 13 स्थानावरून आठव्या स्थानावर पोहचला आहे. हार्दिकने इंग्लंडविरुद्ध शानदार अष्टपैलू कामगिरी केली होती. त्याला मालिकेतील प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हार्दिकने 71 धावा करत चार विकेट्स घेतल्या आणि टीम इंडियाला शानदार विजय मिळवून देण्यात मोठा उचलला.

हार्दिक पांड्याला इंग्लंडविरुद्ध बॅट आणि बॉलने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले. त्याने या मालिकेत जवळपास सहा विकेट घेतल्या आणि 100 धावा केल्या. फलंदाजांच्या क्रमवारीत (ICC ODI Rankings) हार्दिकने आठ स्थानांनी झेप घेत 42व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत नाबाद 125 धावा करण्याचा फायदा झाला. तो एकदिवसीय फलंदाजांमध्ये 25 स्थानांनी झेप घेत 52 व्या स्थानावर पोहोचला आहे.

भारताने इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका 2-1 अशी जिंकली. स्टार वेगवान गोलंदाज बुमराह पाठीच्या समस्येमुळे शेवटच्या वनडेत खेळला नाही. यामुळेच त्याला ताज्या क्रमवारीत (ICC ODI Rankings) अव्वल स्थान गमवावे लागले. याशिवाय इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत सात विकेट घेणारा युझवेंद्र चहल गोलंदाजांमध्ये चार स्थानांनी झेप घेत 16 व्या स्थानावर पोहोचला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला बाहेर बसावे लागले. यामुळे त्याला जागतिक क्रमवारीतील नंबर-1चा मुकुट गमवावा लागला. न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने बुमराहकडून हा मुकुट हिरावून घेतला. दोघांमध्ये फक्त एका गुणाचा फरक आहे. बोल्ट 704 गुणांसह नंबर 1 गोलंदाज ठरला. तर बुमराह 703 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर घसरला. वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह हा एकमेव भारतीय आहे, ज्याचा टॉप-10 मध्ये समावेश आहे. टॉप-20 मध्ये बुमराह व्यतिरिक्त फिरकीपटू युजवेंद्र चहलचा समावेश आहे, जो सध्या 16 व्या क्रमांकावर आहे.

इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल एकदिवसीय सामन्यात बुमराहने दमदार कामगिरी केली होती. त्या सामन्यात त्याने 19 धावांत 6 बळी घेतले. यामुळे टीम इंडियाने हा सामना 10 गडी राखून जिंकला. यानंतर बुमराहने मालिकेतील दुसऱ्या वनडेत दोन विकेट घेतल्या. दुखापतीमुळे मालिकेतील शेवटचा सामना खेळता आला नाही.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत स्थान गमावले आहे. तो चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. तर नुकतेच इंग्लंडविरुद्ध डरहम वनडेत शतक झळकावणारा दक्षिण आफ्रिकेचा व्हॅन डर ड्युसेनने 4 स्थानांची झेप घेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Back to top button