Virat Kohli : आपल्या निवडीवरून विराट कोहलीने बीसीसीआयलाच दिले आव्हान! | पुढारी

Virat Kohli : आपल्या निवडीवरून विराट कोहलीने बीसीसीआयलाच दिले आव्हान!

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीच्या (Virat Kohli) भारतीय संघातील स्थानावर जाणकार आणि माजी क्रिकेटपटू प्रश्न उपस्थित करत आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याचे नाव न घेतल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कोहलीच्या अनुपस्थितीबाबत कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही, मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टार फलंदाज विराट कोहलीने स्वतः बोर्डाला विश्रांतीची विनंती केली असल्याची माहिती समोर आली आहे.

टी-२० संघाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच कोहली (Virat Kohli) आणि बुमराह यांना विश्रांती घ्यायची असल्याचे वृत्त आले होते. वर्कलोड मॅनेजमेंटचा भाग म्हणून बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे, तर निवडकर्त्यांचा कोहलीला विश्रांती देण्याचा कोणताही विचार नव्हता. पण ३३ वर्षीय खेळाडूने बीसीसीआयला या मालिकेतून मला विश्रांती घ्यायची आहे, असे सांगितले होते.

कोहलीसह (Virat Kohli) शक्य तितक्या मजबूत संघाची निवड करण्याची बोर्डाची सुरुवातीची योजना होती. पण विराटला विंडीज दौ-यावर जायचे नव्हते. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, ‘संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांना सध्याच्या इंग्लंड दौऱ्यापासून टी-२० संघ पूर्ण ताकदीने खेळवायचा होता. पण कोहलीने आग्रह धरला की त्याला विश्रांती हवी आहे आणि वेस्ट इंडिजच्या दौ-यावर जायचे नाही. जसप्रीत बुमराहला त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटचा एक भाग म्हणून विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांना एकदिवसीय सामन्यांमधून विश्रांतीची गरज आहे. गेल्या काही महिन्यांपासून विराटला वारंवार ब्रेक मिळत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेसाठीही त्याची निवड झाली नाही,’ असेही सूत्राकडून समजते आहे.

Back to top button