Team India ODI Rankings : ‘लॉर्डस्’वरील पराभवाने भारताची सातव्या स्थानावर घसरण | पुढारी

Team India ODI Rankings : ‘लॉर्डस्’वरील पराभवाने भारताची सातव्या स्थानावर घसरण

लंडन, पुढारी वृत्तसेवा : रिसी टॉप्लीच्या भेदक मारा करताना सहा विकेटस् घेत इंग्लंडला दुसर्‍या वन-डे सामन्यात भारतावर 100 धावांनी विजय मिळवून दिला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. या विजयानंतर इंग्लंडने आयसीसी वन-डे वर्ल्डकप सुपर लीग गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले. तर भारताची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. आयसीसी क्रमवारीतील अव्वल 8 संघ वर्ल्डकप 2023मध्ये थेट पात्र ठरणार आहेत. उर्वरित संघाला आयसीसी वर्ल्डकप पात्रता स्पर्धेत पाच संलग्न संघांसह खेळावे लागेल आणि त्यापैकी दोन संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरतील. 2023 चा वन-डे वर्ल्डकप भारतात होणार आहे, त्यामुळे यजमान म्हणून भारताला थेट पात्रता आहेे. जर ही स्पर्धा भारताबाहेर असती आणि भारताची आणखी दोन स्थानानी घसरण झाली तर त्यांना पात्रता फेरी खेळण्याची नामुष्की आली असती.

इंग्लंडच्या 247 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 146 धावांत तंबूत परतला. रविवारी भारत-इंग्लंड यांच्यातला तिसरा सामना मँचेस्टर येथे खेळवण्यात येणार आहे. 2023 च्या वन-डे वर्ल्डकप स्पर्धेतील आपले स्थान पक्के करण्यासाठी आयसीसी वन-डे वर्ल्डकप सुपर लीगमधील स्थान हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक संघाला एका विजयासाठी 10 गुण मिळतात, तर बरोबरीचा किंवा अनिर्णीत निकालाचा किंवा सामना रद्द झाल्यास प्रत्येक संघाला पाच गुण, परंतु पराभूत संघाला एकही गुण मिळत नाही.

इंग्लंड 125 गुणांसह अव्वल स्थानावर आहे, त्यापाठोपाठ बांगलादेश (120), अफगाणिस्तान (100), पाकिस्तान (90), न्यूझीलंड (80), वेस्ट इंडिज (80), भारत (79), ऑस्ट्रेलिया (70) व आयर्लंड (68) असे अव्वल नऊ संघ आहेत.

दक्षिण आफ्रिकेला धोका

दक्षिण आफ्रिकेने स्थानिक टी-20 ला महत्त्व देताना ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर न जाण्याचा निर्णय घेतला आणि याचा फटका त्यांना वन-डे वर्ल्डकपच्या पात्रतेत बसणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत न खेळल्यामुळे आफ्रिकेला 30 गुणांवर पाणी सोडावे लागणार आहे. त्यांच्या उर्वरित मालिका भारत व इंग्लंडविरुद्ध आहेत आणि नेदरलँडसविरुद्ध दोन सामने होणार आहेत.

Back to top button