रोहित शर्मा याने ११ वर्षांपूर्वीच हेरले होते सूर्यकुमारचे गुण | पुढारी

रोहित शर्मा याने ११ वर्षांपूर्वीच हेरले होते सूर्यकुमारचे गुण

लंडन ; वृत्तसंस्था : रविवारी बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने शतक झळकावले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव हा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. सूर्यकुमारने 55 चेंडूंत 14 चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 117 धावांची अप्रतिम खेळी केली. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शतक ठोकणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी के.एल. राहुलने हा पराक्रम केला आहे. सूर्यकुमारची ही खेळी टी-20 मध्ये भारताची दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. आता त्याच्या पुढे आता फक्त रोहित शर्मा आहे, ज्याच्या नावावर 118 धावांच्या खेळीचा विक्रम आहे.

सूर्यकुमारने शतक झळकावताच रोहितचे 11 वर्षांचे ट्विट व्हायरल होत आहे. रोहितने हे ट्विट 10 डिसेंबर 2011 रोजी केले होते. यात हिटमॅन रोहित शर्माने सूर्यकुमारचे कौतुक केले होते आणि सांगितले होते की, त्याला भविष्यात मुंबईतून खेळताना बघायचे आहे. चेन्नईमध्ये नुकताच बीसीसीआय पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिलो होतो. काही रोमांचक क्रिकेटपटू येत आहेत. मला भविष्यात सूर्यकुमार यादवला मुंबईकडून खेळताना पाहायचे आहे, असे रोहितने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. सूर्यकुमारने शतक झळकावताच रोहित शर्मा याचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.

गोर्‍या साहेबांनीही केले कौतुक

सूर्यकुमार यादवने भारतीय संघ संकटात असताना दमदार खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. त्याच्या खेळीमुळेच भारताला 198 धावांपर्यंत मजल मारता आली. त्याच्या या कामगिरीसाठी तो बाद झाल्यानंतर भारतीय प्रेक्षकांसोबतच इंग्लंडच्या प्रेक्षकांनीही टाळ्या वाजवून त्याला दाद दिली.

चौथ्या क्रमांकावर सर्वोच्च खेळी

सूर्यकुमारची 117 धावांची खेळी ही चौथ्या क्रमांकावर आलेल्या खेळाडूंपैकी सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांवर येऊन सर्वोत्तम खेळ करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर होता, ज्याने 2019 मध्ये बंगळूर येथे भारताविरुद्ध नाबाद 113 धावांची खेळी केली होती.

Back to top button