Video : शेवटच्या षटकात २४ धावा ठोकून न्यूझीलंडचा ‘रेकॉर्डब्रेक’ विजय! | पुढारी

Video : शेवटच्या षटकात २४ धावा ठोकून न्यूझीलंडचा ‘रेकॉर्डब्रेक’ विजय!

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात सर्वाधिक धावा करण्याचा नवा विश्वविक्रम आता न्यूझीलंडच्या नावावर नोंदवला गेला आहे. न्यूझीलंडने आयर्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एका विकेटने जिंकला. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री झालेल्या या सामन्यात किवी संघासमोर 301 धावांचे लक्ष्य होते आणि अवघ्या 120 धावांवर पाच विकेट पडल्या होत्या. तर 49 षटकांत न्यूझीलंडने 281 धावांत नऊ विकेट गमावल्या. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 20 धावांची गरज होती आणि लॉकी फर्ग्युसन, मायकेल ब्रेसवेल क्रीजवर होते.

क्रेग यंग आयर्लंडसाठी शेवटचे षटक टाकण्यासाठी आला आणि समोर ब्रेसवेल 103 धावांवर खेळत होता. ब्रेसवेलने पाच चेंडूंत (4,4,6,4,6) सामना संपवला आणि न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. अशा प्रकारे न्यूझीलंडकडून शेवटच्या षटकात 24 धावा फटकावण्यात आल्या. 31 वर्षीय ब्रेसवेल 82 चेंडूत 127 धावा करून नाबाद परतला. यापूर्वी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय विश्वविक्रमाची नोंद इंग्लंड आणि अफगाणिस्तानच्या नावावर झाली होती. प्रत्येकी एकदा लक्ष्याचा पाठलाग करताना दोघांनी शेवटच्या षटकात 20-20 धावा केल्या आहेत.

तत्पूर्वी, हॅरी टेक्टरने यजमान आयर्लंडसाठी पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. त्याच्या 113 धावांच्या जोरावर आयर्लंडने 9 विकेट गमावून 300 धावांपर्यंत मजल मारली. आता उभय संघांमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Spark Sport (@sparknzsport)

Back to top button