सुनील गावस्कर म्हणाले, ‘विराटच्या धावांवर बोलले जाते, मग रोहितच्या का नाही?’ | पुढारी

सुनील गावस्कर म्हणाले, ‘विराटच्या धावांवर बोलले जाते, मग रोहितच्या का नाही?’

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : क्रिकेट विश्वात सध्या टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म हा सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. माजी क्रिकेटपटूंपासून ते चाहते आणि टीम मॅनेजमेंट याविषयी बरेच काही बोलत आहेत. त्याच्या या खराब फाॅर्ममुळे प्लेईंग-११ मधून वगळण्याची मागणी होत आहे. मात्र आता माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी विराटला पाठिंबा दिला आहे.

कोहलीच्या सध्याच्या फॉर्मबाबत गावस्कर म्हणाले, रोहित शर्मा धावा करत नाही, तेव्हा कोणीच बोलत नाही किंवा एखादा फलंदाज धावा करत नाही तेव्हा कोणी बोलत नाही, मग तुम्ही फक्त विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल बोलता असे का? काही काळ एखाद्या खेळाडूचा खराब फार्म असू शकतो काही वेळा तो अपयशी होऊ शकतो.

सुनील गावस्कर म्हणाले, जर फॉर्मबाबत बोलायचे झाल्यास प्रत्येकजण चढ-उतारातून जात असतो. याचा खेळाडूंच्या गुणवत्तेवर परिणाम होत नाही. त्यामुळे या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. एखादा खेळाडू इतकी वर्षे चांगली कामगिरी करत असताना एक-दोन वाईट मालिकांमुळे तो खराब खेळाडू असल्याचे सिद्ध होत नाही.

गावस्कर पुढे म्हणाले की, विश्वचषकासाठी संघ जाहीर व्हायला अजून दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे एखाद्या खेळाडूवर अगोदरच बोलणे योग्य नाही. संघ जाहीर करण्यापूर्वी निवड समिती सर्व खेळाडूंची चाचपणी करून खेळाडूंचा योग्य तो निर्णय घेतील. एखाद्या खेळाडूवर आतापासून बोलणे योग्य नाही, त्याला थोडा वेळ दिला पाहिजे.

भारताचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी विराट कोहलीला संघातून वगळण्याबाबत एक मोठे विधान केले आहे. रविचंद्रन अश्विनला कसोटी संघातून वगळले जाऊ शकते तर मग विराट कोहलीला टी-२० संघातून का वगळले जाऊ नये, असे विधान केले. कपिल देव यांच्या वक्तव्यानंतरच या मुद्द्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

विराट कोहली त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. तो सातत्याने धावा काढण्यासाठी धडपडत आहेत. रविवारी झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात कोहली ६ चेंडूत ११ धावा काढून बाद झाला. मात्र, या छोट्या डावात त्याने शानदार षटकार आणि चौकार ठोकले.

विराट कोहलीच्या बॅटने गेल्या तीन वर्षांपासून शतक झळकावलेले नाही. विराट कोहलीने नोव्हेंबर २०१९ मध्ये शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. परंतु काही काळापासून तो मोठी धावसंख्याही करू शकला नाही. विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या दोन टी-20 मालिकेत केवळ 12 धावा केल्या आहेत. त्यामुळेच त्याला प्लेईंग-11 मधून वगळण्याची मागणी होत आहे.

Back to top button