…तर मी विराटला निवडले नसते! | पुढारी

...तर मी विराटला निवडले नसते!

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : विराट कोहली आणि धावा यांच्यातील नातेसंबंध गेले काही दिवस संपुष्टात आले आहेत. त्यामुळे त्याचे चाहतेही निराश आहेतच; परंतु क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूही त्याच्यावर आता उघड उघड टीका करू लागले आहेत. कपिलदेव यांच्यानंतर अजय जडेजा यानेही कोहलीला फटकारले असून मी निवडकर्ता असतो तर कोहली आज संघात नसता, असे त्याने म्हंटले आहे.

अजय जडेजा म्हणाला, ‘विराट कोहली खास खेळाडू आहे. जर तो विराट कोहली नसता, तर तो कसोटी क्रिकेटही खेळत नसता. पण, मागील 8-10 सामन्यांत त्याच्या धावा पाहा, त्याला एकही शतक झळकावता आलेले नाही. पण, म्हणून काय तुम्ही त्याला संघाबाहेर बसवू शकत नाही. कारण, त्याने मागील अनेक वर्षांत खोर्‍याने धावा केल्या आहेत. पण, जर मला आता कुणी टी-20 संघ निवडायला सांगितला, तर मी त्याला नक्की बाहेर बसवीन.’

कर्णधारपदाचा भार हलका करूनही विराट कोहलीला सूर गवसलेला नाही. पाच महिन्यांनंतर टी-20 संघात पुनरागमन करणारा विराट इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या सामन्यात 1 धावेवर माघारी परतला. 34 वर्षीय पदार्पणवीर रिचर्ड ग्लिसनने त्याची विकेट घेतली आणि चाहते पुन्हा नाराज झाले. क्रिकेटमध्ये आता अशी कोणतीच पद्धत राहिली नसेल की ज्यावर विराट बाद झाला नसावा. तो खराब फॉर्मातून बाहेर येण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय, परंतु यश त्याच्या वाट्याला येताना दिसत नाही. अशात विराटचे टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या संघातील स्थान धोक्यात आल्याची चर्चा आहे.

Back to top button