रोहितने विराटचा बचाव करत कपिल देव यांना हाणला टोला, म्हणाला… | पुढारी

रोहितने विराटचा बचाव करत कपिल देव यांना हाणला टोला, म्हणाला...

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीची निराशाजनक कामगिरी इंग्लंडविरुद्धच्या अंतिम टी २० सामन्यातही कायम राहिली. मात्र, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने विराटची पाठराखण करत चक्क माजी कर्णधार कपिल देव यांनाच प्रत्युत्तर दिले आहे. कपिल देव यांनी अलीकडेच विराटच्या संघातील स्थानावरून टीप्पणी केली होती. ते म्हणाले होते की, जेव्हा क्रमांक दोनचा गोलंदाज असलेल्या आर अश्विनला कसोटी संघातून वगळले जाऊ शकते, तर विराटला टी-२० संघातून का वगळले जाऊ शकत नाही? असा सवाल उपस्थित केला होता. जर विराट चांगली कामगिरी करत नसेल तर तुम्ही या दीपक हुड्डा सारख्या तरुण खेळाडूंना बाहेर ठेवू शकत नाही, असेही कपिल देव यांनी म्हटले होते.

इंग्लंडविरुद्धच्या टी २० मालिकेतील दोन सामन्यांमध्ये विराटला केवळ १२ धावा करता आल्या. त्यामुळे त्याच्यावर अनेक दिग्गज क्रिकेटपटू नाराज आहेत. भारताचे विश्वचषक चॅम्पियन माजी कर्णधार कपिल देव यांनीही विरटच्या कामगिरीवरून टीप्पणी केली आहे. त्यावरून सध्याचा भारतीय कर्णधार रोहित शर्माने विराटचा पाठराखण करत थेट कपिल देव यांनाच प्रतुत्तर दिले आहे. भारत-इंग्लंड तिसऱ्या टी २० नंतर रोहितने म्हटले आहे की, एक किंवा दोन वाईट मालिका कोहलीला खराब खेळाडू बनवत नाहीत. त्याच्या या आधीच्या कामगिरीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. ते (कपिल देव) बाहेरून खेळ पाहत असतात आणि आत काय चालले आहे ते त्याना कळत नाही. आमची स्वतःची विचार प्रक्रिया आहे. आम्ही आमचा संघ तयार करतो आणि त्यामागे खूप विचार असतो. आम्ही संघातील खेळाडूंना सपोर्ट करतो आणि त्यांना संधी देतो. अशा स्थितीत तुम्हाला या गोष्टी बाहेरून कळत नाहीत. त्यामुळे बाहेर काय घडत आहे हे महत्त्वाचे नाही, तर आत काय घडत आहे ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहे’, असा टोला लगावला आहे.

विराट कोहली त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. तो सातत्याने धावा काढण्यासाठी धडपडत आहेत. रविवारी झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात कोहली ६ चेंडूत ११ धावा काढून बाद झाला. मात्र, या छोट्या डावात त्याने शानदार षटकार आणि चौकार ठोकले.

ते पुढे म्हणाले की, जर फॉर्मबाबत बोलायचे झाल्यास प्रत्येकजण चढ-उतारातून जात असतो. खेळाडूंच्या गुणवत्तेवर परिणाम होत नाही. त्यामुळे या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. एखादा खेळाडू इतकी वर्षे चांगली कामगिरी करत असताना एक-दोन वाईट मालिकांमुळे तो खराब खेळाडू असल्याचे सिद्ध होत नाही. आम्ही जे संघात आहोत त्यांना खेळाडूचे महत्त्व माहित आहे. त्यांना (कपिल देव) याबद्दल बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्यांचे बोलणे आमच्यासाठी फारसे महत्त्वाचे नाही, असेही रोहितने स्पष्ट केले.

Back to top button