वर्ल्डकप संघातील कोहलीचे स्थान धोक्यात?

वर्ल्डकप संघातील कोहलीचे स्थान धोक्यात?

मुंबई ; वृत्तसंस्था : विराट कोहलीने गतवर्षी झालेल्या टी-20 वर्ल्डकपनंतर भारतीय टी- 20 संघाचे कर्णधारपद सोडले होते. मात्र, या घटनेला 9 महिने होत नाहीत तोच विराट कोहलीची टी-20 वर्ल्डकप संघातील जागा देखील धोक्यात आली आहे. यंदाचा टी-20 वर्ल्डकप ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणार आहे. इंग्लंडमधील मर्यादित षटकांची मालिका विराट कोहलीसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. विराटने या मालिकेत फॉर्म दाखवला नाही, तर त्याला बीसीसीआय आणखी संधी देणार नाही. कामगिरी कर अन्यथा बाहेरचा रस्ता, असा इशाराच जणू बीसीसीआयने दिला आहे.

दरम्यान, बुधवारी भारतीय निवड समितीने वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय संघाची घोषणा केली. या संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार असून रवींद्र जडेजाला उपकर्णधार करण्यात आले आहे. या मालिकेसाठी संघातील प्रमुख खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे.

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार रोहित, पंत आणि पंड्या हे संघासोबत वेस्ट इंडीजमध्ये असणार आहेत. कारण तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेनंतर भारत पाच टी-20 सामन्यांची मालिका देखील खेळणार आहे. आता भारताचा रन मशिन विराट कोहली जो सध्या धावांच्या दुष्काळातून जात आहे, त्याचे टी-20 संघातील भवितव्य हे इंग्लंडविरुद्धच्या दोन टी-20 सामने आणि वन-डे मालिकेवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे विराट कोहली भारताच्या वर्ल्डकप टी-20 संघात सहज स्थान मिळवणार की त्याला त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार, हे येणारे 10 दिवस ठरवणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समितीत देखील विराट कोहली टी-20 संघातील मध्यल्या फळीत बसतो की नाही याबाबत स्पष्टता दिसत नाही. 'रोहित, पंत आणि पंड्या हे वेस्ट इंडीजमध्ये टी-20 मालिका खेळणार आहेत. बुमराहला विंडीज दौर्‍यावर पूर्ण विश्रांती देण्यात आली आहे. विराट कोहलीचे म्हणाल तर संघ व्यवस्थापन टी-20 वर्ल्डकप संघासाठी काय गरजेचे आहे हे पाहून निर्णय घेतील. इंग्लंडमधील मर्यादित षटकांची मालिका विराट कोहलीसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे.' अशी माहिती या सूत्रांनी दिली.

भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पूर्ण क्षमतेचा भारतीय संघ मैदानात उतरवण्याची योजना आखत आहे. विशेष करून टी-20 सामन्यात इंग्लंड दौर्‍यापासून टी- 20 वर्ल्डकपसाठीचा मुख्य संघ मैदानात उरतवण्यात येईल. याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय वरिष्ठ खेळाडूंना सातत्याने विश्रांती देण्याबाबत नाराज आहे.

* विराट कोहलीची ट्वेंटी-20 तील कामगिरी
* 97 सामने/ 3296 धावा / 51.5 ची सरासरी
* मागील सहा महिन्यांत विराटची सरासरी 26च्या खाली
* नोव्हेंबर 2019नंतर त्याने एकही शतक झळकावलेले नाही
* सर्व फॉरमॅटमध्ये त्याची बॅटिंग सरासरीची घसरण
* आयपीएल 2022मध्ये त्याने 16 सामन्यांत 22.73च्या सरासरीने 341 धावा केल्या
* मधल्या फळीसाठी सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, दीपक हुडा व श्रेयस अय्यर आदी पर्याय आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news