पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Test Ranking : इंग्लंड क्रिकेट संघाचा महान फलंदाज जो रूट हा ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीनुसार नंबर 1 फलंदाज बनला आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लॅबुशेनला मागे टाकत त्याने हे स्थान पटकावले. जो रूटची अलीकडची कामगिरी शानदार राहिली आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत आतापर्यंत 2 सामन्यांत 2 शतके झळकावली असून बॅक टू बॅक शतकांच्या जोरावर तो कसोटीतील टॉपचा फलंदाज ठरला आहे. या क्रमवारीची यादी आयसीसीने नुकतीच जाहीर केली.
फलंदाजांच्या आयसीसी कसोटी क्रमवारीनुसार, जो रूट 897 गुणांसह पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. रूटने जानेवारी 2021 पासून कसोटी फॉरमॅटमध्ये 10 शतके, तसेच एका कॅलेंडर वर्षात 4 शतके झळकावली आहेत. यामुळे तो आता आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. (ICC Test Ranking)
जो रूटने नुकतेच न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत शतक झळकावले आणि त्यानंतर नॉटिंगहॅममध्ये त्याने 176 धावांची इनिंग खेळली होती. रूटच्या आधी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅबुशेन होता. लॅबुशेनचे सध्या 892 गुण आहेत आणि तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आयसीसी कसोटी क्रमवारीतील उर्वरित फलंदाजांबद्दल चर्चा करायची झाल्यास, स्टीव्ह स्मिथ 845 गुणांसह तिसऱ्या, तर पाकिस्तानचा बाबर आझम 815 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ न्यूझीलंडचा केन विल्यमसन, श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने आणि ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहे. (ICC Test Ranking)
यानंतर टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत 754 गुणांसह 8 व्या क्रमांकावर आहे. माजी कर्णधार विराट कोहली टॉप-10 मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. वास्तविक, आयसीसी कसोटी क्रमवारीत पाहिल्यास विराट कोहली 742 गुणांसह 10 व्या क्रमांकावर आहे. (ICC Test Ranking)