Ind Vs Eng 2nd Test: लॉर्डसवर भारताचा ऐतिहासिक विजय


भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्‍मद सिराज याने सलग दोन चेंडूवर  इंग्‍लंडच्‍या दोन फलंदाजांना तंबूत धाडले.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्‍मद सिराज याने सलग दोन चेंडूवर इंग्‍लंडच्‍या दोन फलंदाजांना तंबूत धाडले.
Published on
Updated on

लंडन ; पुढारी ऑनलाईन : Ind Vs Eng 2nd Test: लंडन : वृत्तसंस्था : मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी फलंदाजीत केलेल्या अतुलनीय कामगिरीच्या जोरावर भारताने इंग्लंडवर दुसर्‍या कसोटीत 151 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्‍या लॉर्डस्वर भारताचा हा फक्त तिसरा कसोटी विजय आहे. यापूर्वी भारताने 2014 आणि 1986 मध्ये येथे विजय मिळवला होता. पहिल्या डावात शतकी खेळी करणार्‍या के. एल. राहुल याला 'सामनावीर'चा पुरस्कार देण्यात आला.

सोमवारचा दिवस उजाडला तेव्हा इंग्लंड विजयाची स्वप्ने पहात होता. पंतला लवकर बाद केल्यानंतर त्यांना विजय आवाक्यात वाटत होता. परंतु, अशावेळी मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या दोन खंद्या वीरांनी इंग्लंडच्या मार्‍याचा धाडसाने मुकाबला केला आणि नवव्या विकेटस्साठी 89 धावांची नाबाद भागीदारी केली. यामुळे भारताला विजयाची संधी निर्माण झाली.

भारताने इंग्लंडला विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य दिले. सकाळी विजयाची स्वप्ने पाहणार्‍या इंग्लंडला कसोटी वाचवण्यासाठी धडपडावे लागले. परंतु, भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा दुसरा डाव 120 धावांत गुंडाळून संघाच्या नावावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

मोहम्मद शमी (नाबाद 56) आणि जसप्रीत बुमराह (नाबाद 34) यांनी केलेल्या 89 धावांच्या ऐतिहासिक भागीदारीच्या जोरावर भारताने आपला दुसरा डाव 8 बाद 298 धावांवर घोषित करीत इंग्लंडला विजयासाठी 272 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर खेळणार्‍या इंग्लंडला पहिलाच झटका पहिल्याच षटकांत बसला. बुमराहने बर्न्सला बाद करीत भारताला दमदार सुरुवात करून दिली.

त्यानंतर दुसर्‍याच षटकांत शमीने डॉमिनिक सिबलीला बाद करीत इंग्लंडची अवस्था 2 बाद 1 अशी केली. त्यानंतर ज्यो रूट आणि हमीद यांनी तिसर्‍या विकेटस्साठी 42 धावा रचल्या. हमीदला बाद करीत इशांतने इंग्लंडला तिसरा धक्का दिला. चहापानाला खेळ थांबण्याआधी इशांतने जॉनी बेअस्टोला (2) पायचित करून भारताला चौथे यश मिळवून दिले.

चहापानानंतर पहिल्याच षटकांत बुमराहने रूटला बाद करून भारताच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला. 33 धावा करणार्‍या रूटने स्लीपमधील कोहलीकडे झेल दिला. त्यानंतर जोस बटलर आणि मोईन अली यांनी जम बसवण्यास सुरुवात केली. त्यांनी बराच वेळ किल्ला लढवला; पण मोहम्मद सिराजने मोईन अलीला बाद केले.

पाठोपाठ सॅम कुरेनची विकेटही त्याला एकावर एक फ्री मिळाली. या दोन विकेटनंतर बटलरने ओली रॉबिन्सनला साथीला घेतले आणि प्रतिकार सुरू ठेवला. मात्र, या दोघांची जमलेली जोडी बुमराहने फोडली. त्याने ओली रॉबिन्सनला धिम्या चेेंडूवर चकवले आणि पायचित केले. एका बाजूने विकेट जात असताना दुसरीकडे बटलर मात्र नांगर टाकून बसला होता.

शेवटी हा नांगर मोहम्मद सिराजने उखडून टाकला. बटलरने 96 चेेंडू खेळून 25 धावा केल्या. भारत ऐतिहासिक विजयापासून फक्त एक विकेट दूर होता. सिराजने हे यश मिळवून द्यायला फार वेळ लावला नाही. याच षटकांत त्याने अँडरसनची ऑफस्टम्प अलगद उखडून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

तत्पूर्वी, पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर ऋषभ पंत 22 धावांवर बाद झाला. रॉबिन्सन याच्या गोलंदाजीवर पंत झेलबाद झाला. यानंतर इशांत शर्मा 24 चेंडूंवर 16 धावांवर बाद झाला. यानंतर भारताचा डाव एक, दोन षटकांत आटपेल असे वाटत असताना शमी आणि बुमराह यांनी ऐतिहासिक खेळी करीत, भारताला पराभवापासून आणि इंग्लंडला विजयापासून लांब नेले. इतकेच नाही तर त्यांच्या भागीदारीमुळे भारताला विजयाची आशाही निर्माण झाली होती. या भागीदारीमुळे भारताने 271 धावांची आघाडी घेतली होती.

कपिल-मदनलालचा विक्रम मोहम्मद शमी, बुमराहने मोडला

गोलंदाजीमध्ये इंग्रजांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी फलंदाजीमध्येही नेत्रदीपक कामगिरी केली आहे. दोघांनी नवव्या विकेटस्साठी नाबाद 89 धावांची भागीदारी करीत संघाला सुस्थितीत नेले. शमीने कसलेल्या फलंदाजाप्रमाणे चौफेर फटकेबाजी करताना शानदार अर्धशतक ठोकले.

त्याला बुमराहने संयमी नाबाद 34 धावा करीत उत्तम साथ दिली. दोघांनी इंग्लंडच्या वेगवान मार्‍याचा समर्थपणे सामना करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. दोघांनी केलेल्या 89 धावांच्या भागीदारीने भारत आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकला; पण विक्रमही रचला गेला.

भारतासाठी यापूर्वी नवव्या विकेटस्साठी याच मैदानावर 1982 मध्ये कपिल देव आणि मदनलाल यांनी 66 धावांची भागीदारी केली होती. ती आज मोडीत काढत नवा विक्रम शमी आणि बुमराह जोडीने नोेंदवला.

हेही वाचलं का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news