

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या समाप्तीनंतर, भारतीय खेळाडूंच्या नजरा 9 जूनपासून दक्षिण आफ्रिकेसोबतच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेवर खिळल्या आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची T20 मालिका सुरू होण्यापूर्वी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना एक धोकादायक सल्ला दिला आहे.
भारत विरुद्ध द. आफ्रिका T 20 मालिका खास आहे कारण 2021 च्या T20 विश्वचषकानंतर हार्दिक पंड्याचे पहिल्यांदाच भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. आयपीएल 2022 मधील अष्टपैलू कामगिरीमुळे हार्दिकची संघात निवड करण्यात आली आहे. हार्दिकने कर्णधार म्हणून पदार्पणाच्या मोसमात गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवले आहे.
दरम्यान, भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी एका क्रीडा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक विधान केले आहे. ते म्हणाले की, हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत यांनी आगामी मालिकेत भारतासाठी पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली तर संघ केवळ सहा षटकांत 120 धावा करू शकतो, असे भाकीत केले आहे. हार्दिक पंड्याने आयपीएल 2022 मध्ये 44.27 च्या सरासरीने आणि 131.27 च्या स्ट्राइक रेटने 487 धावा केल्या. त्याने 7.28 च्या इकॉनॉमी रेटने आठ विकेट्सही घेतल्या आहेत.
गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले, 'मला वाटते हार्दिक, ऋषभला 5 व्या किंवा या 6 व्या क्रमांकावर खेळवले जाईल. जर असे झालेच तर 14 ते 20 व्या षटकांमध्ये ते विस्फोटक फलंदाजी करू शकतील आणि अखेरच्या सहा षटकांमध्ये टीम इंडिया 100 ते 120 धावा वसूल करेल. माझा विश्वास आहे की ते दोघे अशी कामगिरी करण्यासाठी सक्षम आहेत. मी त्या क्षणांचा साक्षिदार होण्यास उत्सुक आहे.'