Ravi Shastri : द्विपक्षीय टी 20 मालिका बंद करा, शास्त्री गुरुजींची मागणी | पुढारी

Ravi Shastri : द्विपक्षीय टी 20 मालिका बंद करा, शास्त्री गुरुजींची मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ सामन्यांची द्विपक्षीय टी २० मालिका ९ जूनपासून सुरू होत आहे. पण त्याआधी भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (ravi shastri) यांनी एक धक्कादायक विधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. टी २० फॉर्मेटमध्ये कोणतीही द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जाऊ नये. फुटबॉलप्रमाणे टी २० क्रिकेटमध्ये केवळ विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जावे, असे म्हणून त्यांनी क्रिकेट जगतात धुरळा उडवून दिला आहे. क्रीडा विषय वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी आपले मत मांडले.

शास्त्री (ravi shastri) यांना असेही वाटते की, क्रिकेट चाहत्यांचा उत्साह पाहता फ्रँचायझी क्रिकेटसह दोन वर्षांतून टी २० विश्वचषक स्पर्धा होणे हा सर्वोत्तम मार्ग ठरेल. टी 20 मध्ये ब-याच द्विपक्षीय मालिका खेळवल्या जातात. मी भारतीय संघाचा प्रशिक्षक असतानाही यापूर्वीही असे मत मांडले आहे. खरेतर शेवटची टी-२० मालिका कधी झाली हे आठवणे कठीण आहे. हे ‘टी-20 क्रिकेट’ फुटबॉलसारखे असावे जिथे फक्त विश्वचषक स्पर्धा खेळली जाते.

‘भारताचा प्रशिक्षक म्हणून गेल्या सहा-सात वर्षांत विश्वचषक वगळता मला एकही सामना आठवत नाही. विश्वचषक जिंकणारा संघ लक्षात ठेवेल. दुर्दैवाने, आम्ही जिंकलो नाही म्हणून मला ते आठवत नाही. मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? तुम्ही जगभरात फ्रँचायझी क्रिकेट खेळता, प्रत्येक देशाला त्यांचे स्वतःचे फ्रँचायझी क्रिकेट खेळण्याची परवानगी आहे, जे त्यांचे देशांतर्गत क्रिकेट आहे आणि मग दर दोन वर्षांनी तुम्ही येऊन विश्वचषक खेळता, असेही शास्त्री (ravi shastri) यांनी सांगितले.

Back to top button