Dinesh Karthik : कार्तिकचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी का होत आहे? | पुढारी

Dinesh Karthik : कार्तिकचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी का होत आहे?

पुढारी ऑनलाईन डेस्क : RCB चा विकेटकीपर-फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आयपीएल 2022 मध्ये त्याच्या फलंदाजीमुळे चर्चेत आहे. आपल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघातही स्थान मिळवले आहे. या हंगामात, त्याने आरसीबीसाठी फिनिशर म्हणून अप्रतिम भूमिका बजावली आहे आणि अनेक सामन्यांमध्ये संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. (dinesh karthik statement on babar azam)

दरम्यान, कार्तिक सध्या भारतीय चाहत्यांच्या निशाण्यावर आला असून त्याने विनाकारण नवा वाद ओढवून घेतला आहे. कार्तिकने चक्क पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमचे गुणगाण गात त्याच्या बद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. येणा-या काळात बाबर आझम क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये क्रमांक एकचा फलंदाज बनेल असे विधान कार्तिकने केले आहे. त्याच्या या कौतुक सोहळ्यानंतर भारतीय चाहत्यांनी कार्तिकला चांगलेच धारेवर धरले आहे. (dinesh karthik statement on babar azam)

राजस्थानविरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यापूर्वी कार्तिकने (Dinesh Karthik) एका वाहिनीला मुलाखत दिली. ज्यामध्ये त्याने बाबरबद्दल धाडसी भाकीत केले. तो म्हणाला, ‘क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये जगातील नंबर वन बॅट्समन बनण्याची क्षमता आहे. तो एक उच्च दर्जाचा खेळाडू आहे. बाबर सध्या आयसीसी क्रमवारीत T20 आणि ODI फॉरमॅटमध्ये नंबर वन फलंदाज आहे तसेच टेस्ट फॉरमॅटमध्येही पाचव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर बाबर आझम क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनणारा जगातील पहिला खेळाडू बनून इतिहास रचू शकतो, असे कार्तिकने व्यक्त केले. (dinesh karthik statement on babar azam)

बाबर आझम क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे आणि त्याने वेगवेगळ्या क्रमांकावर चांगल्या फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. तो पाकिस्तान संघातील खेळाडूंसाठी प्रेरणा बनला आहे. जेव्हा मी त्याला फलंदाजी करताना पाहतो तेव्हा त्याच्या दोन गोष्टी मला सर्वात जास्त प्रभावित करतात. पहिला त्याचे संतुलन आणि दुसरा त्याचा स्ट्राइकिंग पॉइंट. बॅकफूट असो किंवा फ्रंट फूट चेंडू फटकावण्याची त्याची क्षमता खूपच प्रभावी असल्याचेही कार्तिकने म्हटले आहे.

दिनेश कार्तिकच्या या वक्तव्यामुळे अनेक भारतीय चाहते प्रचंड संतापले आहेत. सोशल मीडियातून कार्तिकवर टीका होत असून त्याचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी होत आहे. एका चाहत्याने त्याला भारतीय संघातूनही वगळण्याचा सल्ला दिला आहे.

Back to top button