

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडच्या कसोटी संघाचा नवा कर्णधार बनताच बेन स्टोक्सने कौंटी क्रिकेटमध्ये धमाकेदार खेळीचे प्रदर्शन केले आहे. त्याने राष्ट्रीय संघाचा कॅप्टन बनण्याचा आनंद शतक ठोकून साजरा केला आहे. कौंटी चॅम्पियनशिपमध्ये (डीविजन दोन) डरहॅमकडून खेळताना त्याने शुक्रवारी शानदार शतकी खेळी साकारली. एवढेच नाही तर त्याने एका षटकात सलग ५ चेंडूत ५ षटकार मारून एकूण ३४ धावा वसूल केल्या. २ दिवसीय सामन्याच्या दुस-या दिवशी उपाहारापर्यंत स्टोक्सच्या संघाने वूस्टरशायरविरुद्ध ४ गडी गमावून ५४९ धावांची मोठी धावसंख्या उभारली आहे. १४७ धावा करून स्टोक्स नाबाद राहिला आहे असून त्याच्या बॅटमधून द्विशतक झळकण्यावर प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. (Ben Stokes Century)
डरहॅम संघाने दुसऱ्या दिवशी ३ बाद ३३९ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. तोपर्यंत बेन स्टोक्स फलंदाजीला आला नव्हता. त्याने २ तासांपेक्षा कमी कालावधीत तुफान फटकेबाजी करून शतक पूर्ण केले. यावरून त्याच्या धडाकेबाज खेळीचा अंदाज लावता येईल. स्टोक्स ८२ चेंडूत १४७ धावा करून स्क्रिजवर आहे. त्याचा स्ट्राइक रेट १७९ इतका आहे. त्याने आतापर्यंत १५ षटकार आणि ८ चौकार मारले आहेत. म्हणजेच त्याने चेंडू सीमापार लगावत १२२ आणि धावून केवळ २५ धावा केल्या आहेत. स्टोक्सचे हे प्रथम श्रेणी कारकिर्दीतील २० वे शतक आहे. त्याने ६४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. क्लबच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान शतक आहे. (Ben Stokes Century)
डावखुरा फिरकी गोलंदाज जोस बेकर डरहॅमच्या डावातील ११७ वे षटक टाकण्यासाठी आला. याच षटकात स्टोक्सने सलग ५ चेंडूत ५ षटकार ठोकले. तर शेवटच्या चेंडूवर चौकार लगावला. पहिल्याच चेंडूवर स्टोक्सने गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. दुसऱ्या चेंडूवर डीप मिडविकेटवर आणि तिसऱ्या चेंडूवर लाँग ऑफला षटकार खेचला. तर चौथा आणि पाचवा चेंडूही सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. आता तो सलग ६ षटकार ठोकण्याची विक्रमाशी बरोबरी करेल असेल असे स्टेडियममधील प्रेक्षकांना वाटले. मात्र, शेवटच्या चेंडूवर त्याला चौकार मारता आला. (Ben Stokes Century)
कौंटी क्रिकेट सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमापासून बेन स्टोक्स फक्त एक पाऊल दूर आहे. ऑस्ट्रेलियाच्या अँड्र्यू सायमंड्सने १६ षटकार मारले होते. स्टोक्सच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकली तर या सामन्यापूर्वी त्याने १५६ सामन्यांमध्ये ३५ च्या सरासरीने ८८५४ धावा केल्या होत्या. यावेळी त्याच्या नावावर १९ शतके आणि ४५ अर्धशतके होती. त्याने २५८ धावांची सर्वात मोठी खेळीही खेळली आहे. याशिवाय या वेगवान गोलंदाजाने ३४९ विकेट्सही घेतल्या आहेत. (Ben Stokes Century)
३० वर्षीय बेन स्टोक्सचे आंतरराष्ट्रीय कसोटीतील रेकॉर्डही उत्कृष्ट आहे. त्याने ७९ सामन्यात ३६ च्या सरासरीने ५०६१ धावा केल्या आहेत. त्याने ११ शतके आणि २६ अर्धशतके केली आहेत. याशिवाय त्याने १७४ विकेट्सही घेतल्या आहेत.