Asian Games Postponed : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार! आशियाई क्रीडा स्पर्धा स्थगित | पुढारी

Asian Games Postponed : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार! आशियाई क्रीडा स्पर्धा स्थगित

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनमधील हांगझोऊ शहरात सप्टेंबरमध्ये होणार्‍या आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, आशिया ऑलिम्पिक कौन्सिलचे (ओसीए) कार्यवाहक अध्यक्ष रणधीर सिंग यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. शांघायच्या नैऋत्येस सुमारे 175 किलोमीटर अंतरावर असलेल्या झेजियांग प्रांताच्या राजधानीत 10 ते 25 सप्टेंबर दरम्यान 19 वी आशियाई क्रीडा स्पर्धा होणार होती. (Asian Games Postponed)

ओमिक्रॉन विषाणूमुळे चीनमध्ये हाहाकार माजला आहे. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. चीनच्या 26 शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. चीनच्या सरकारने कडक निर्बंध लागू करत तब्बल 21 कोटी लोकांना त्यांच्या राहत्या घरात स्थानबद्ध केले आहे. झिजिंगयान, जिलिन, शांघाय, बीजिंगसह 8 प्रांतांमध्ये जवळपास दोन महिन्यांपासून शाळा बंद आहेत. (Asian Games Postponed)

40 खेळांचे 61 इव्हेंट

आशियाई क्रीडा स्पर्धेत 11,000 हून अधिक खेळाडू सहभागी होणार होते. ही संख्या उन्हाळी ऑलिम्पिकपेक्षा जास्त आहे. चीनमध्ये होणा-या आशियाई क्रीडा स्पर्धेत एकूण 40 खेळांच्या 61 स्पर्धा होणार आहेत. यात जलतरण, तिरंदाजी, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, घोडेस्वारी, तलवारबाजी, फुटबॉल, हॉकी, ज्युडो, कबड्डी आणि ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणार्‍या इतर खेळांचा समावेश आहे. यावेळच्या आशियाई स्पर्धेत तब्बल 11 वर्षांनी टी-20 चे पुनरागमन होणार होते. (Asian Games Postponed)

भारताने 1990 वगळता प्रत्येक वेळी सुवर्णपदके जिंकली

1990 वगळता प्रत्येक आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने किमान एक सुवर्णपदक जिंकले आहे. त्याच वेळी, पदकतालिकेतील पहिल्या 10 देशांमध्ये नेहमीच भारताने स्थान पटकावले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत 139 सुवर्ण, 178 रौप्य आणि 299 कांस्य पदके जिंकली आहेत. (Asian Games Postponed)

Back to top button