अजित पवार : ‘इकडं हा सत्ताधारी अन् तिकडं तो सत्ताधारी’ यास पोलिसांनी बळी पडू नये’ | पुढारी

अजित पवार : 'इकडं हा सत्ताधारी अन् तिकडं तो सत्ताधारी' यास पोलिसांनी बळी पडू नये'

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : देशात महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा चांगली आहे. तेव्हा काम करत असताना कोणत्याही सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकीय दबावाला बळी पडून तपासाकडे दुर्लक्ष करू नका. आपले काम निष्पक्षपणे पार पाडावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपुरात केले. नागपुरात सिव्हील लाईन्स येथे पोलिस भवन या भव्य इमारतीचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलीसांना उद्देशून अजित पवार म्हणाले की,  इकडं हा सत्ताधारी अन् तिकडं तो सत्ताधारी, असे करून आपले काम प्रभावित होऊ देऊ नका, असे पवार म्हणाले.

अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांचे मानले आभार

यावेळी अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. पोलिस भवनाचे लोकार्पण केल्यानंतर पवार म्हणाले, या भव्य व सुंदर इमारतीच्या भूमिपूजनापासून ते उद्‍घाटनापर्यंत ज्यांनी पोलिस भवन उभारण्यासाठी सहकार्य केले, त्या सर्वांना धन्यवाद देतो. तर त्यांनी प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नावाचा उल्लेख केला. या कामाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन २०१८ साली करण्यात आले होते.

वरिष्ठांना लगावले टोले

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  कनिष्ठ दर्जाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांशी नीट वागावे. अधिकाऱ्यांना एखाद्या ठिकाणी नेमणूक मिळते तेव्हा ती नेमणूक काही काळासाठी असते. बदलीनंतर आपल्या सहकाऱ्यांनी आपल्याबाबत चांगल्या आठवणी ठेवाव्यात, अशी वागणूक आपण त्यांना द्यायला हवी, असा टोला अजित पवारांनी पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लगावला.

पोलिस भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, क्रीडा व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, पोलिस गृहनिर्माण महामंडळाचे महासंचालक विवेक फनसाळकर, अपर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस अधीक्षक विजय मगर उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button