जयसिंगपूर : जीएसटी अधीक्षक, निरीक्षक 50 हजार लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात | पुढारी

जयसिंगपूर : जीएसटी अधीक्षक, निरीक्षक 50 हजार लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा

येथील सेंट्रल जीएसटी परिक्षेत्र 2 च्या जयसिंगपूर कार्यालयातील अधीक्षकासह एका निरीक्षकाला सीबीआयने 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाच घेणारे जीएसटी अधीक्षक महेश नेसरीकर व निरीक्षक अमितकुमार मिश्रा यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास जीएसटी कार्यालयाच्या परिसरात घडली. शुक्रवारी येथील न्यायालयात या दोघांना हजर करण्यात आले. मात्र याबाबत सीबीआय विभाग व सरकारी वकिलांनी अत्यंत गोपनीयता पाळली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदाराने 2017 ते 2020 मधील सेवाकर दायित्वाबद्दल प्रकरण निकाली काढण्यासाठी अर्ज केला होता. हे प्रकरण निकालात काढण्यासाठी तक्रारदाराकडे 75 हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती. अखेर 50 हजार रुपयांवर तडजोड झाली. तक्रारदाराने याबाबतची तक्रार सीबीआयकडे दिल्यानंतर जयसिंगपुरात सापळा रचण्यात आला होता.

या सापळ्यात जीएसटी विभागाचे अधीक्षक महेश नेसरीकर यांच्यासह निरीक्षक अमित मिश्रा हे दोन्ही अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडले. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर जयसिंगपूर आणि कोल्हापूर येथील त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. यामध्ये काही आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. अटक केलेल्या संशयितांना जयसिंगपूर येथील न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेमुळे जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली. या कारवाईची नोंद जयसिंगपूर पोलिसात रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.

Back to top button