विराट कोहली याचे प्लेईंग 11 मधील स्थान धोक्यात? | पुढारी

विराट कोहली याचे प्लेईंग 11 मधील स्थान धोक्यात?

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : आयपीएल 2022 मध्ये आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली याने सात सामन्यांत 20 हून अधिक धावांच्या सरासरीने अवघ्या 119 धावा जमविल्या आहेत. विराट हा केवळ आयपीएलमध्येच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही अपयशी ठरत आहे. त्याने शेवटचे शतक 2019 मध्ये झळकावले होते. खराब फॉर्म पाहता आयपीएलच्या उर्वरित सामन्यांत विराटला अंतिम अकरातील स्थान गमवावे लागण्याची शक्यता आहे.

आयपीएलचा 31 वा सामना बेंगलोर आणि लखनौ यांच्यात खेळविला गेला. यामध्ये लखनौचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून बेंगलोरला फलंदाजी करण्यास निमंत्रित केले. तर कर्णधार प्लेसिससोबत सलामीला आलेला अनुज रावत 4 धावांवर बाद झाला. यामुळे विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, विराट चमिराच्या गोलंदाजीवर दीपक हुड्डाकडे झेल देऊन परतला. पाच वर्षांनंतर विराट शून्यावर बाद झाला.

2019 च्या सत्रात ज्यावेळी विराट फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरत असे. त्यावेळी विराट हमखास मोठी खेळी करणार असे चाहत्यांना वाटत असे. मात्र, चार वर्षांत विराटचा खेळ पूर्णपणे बदलला आहे. आता तर त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ अत्यंत कमी झाला आहे. याशिवाय त्याला नशीबही साथ देईनासे झाले आहे.

आयपीएलमध्ये पाच शतके ठोकणार्‍या विराटने या हंगामात आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावलेले नाही. आयपीएल 2020, 2021 मध्येही हा दिग्गज फलंदाज अपयशी ठरला होता. हा खराब फॉर्म पाहता उर्वरित साखळी सामन्यांत बेंगलोरच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये विराट कोहली याला संधी मिळते का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Back to top button