पुढारी ऑनलाईन डेस्क : Corona in IPL : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या (IPL 2022) 15 व्या हंगामातील 24 सामने खेळले गेले आहेत, परंतु 25 व्या सामन्यापूर्वी आयपीएल 2022 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघातील एका महत्त्वाच्या सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दिल्ली कॅपिटल्सला त्यांचा पुढील सामना शनिवारी 16 एप्रिल रोजी खेळायचा आहे, परंतु त्यापूर्वी संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोविड-19 चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत.
आयपीएलने याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या निवेदनानुसार, दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट हे कोविड-19 च्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत आणि सध्या ते आयसोलेशनमध्ये आहेत. सध्या दिल्ली कॅपिटल्सचे वैद्यकीय पथक त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. फरहार्ट सध्या संघासोबत प्रवास करणार नसून त्यांना किमान एक आठवडा क्वारंटाईनमध्ये रहावे लागेल. (Corona in IPL)
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, आयपीएल 2020 चा संपूर्ण हंगाम भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे UAE मध्ये खेळला गेला होता, तर IPL 2021 चा अर्धा भाग कोरोना संसर्गामुळे पुढे ढकलावा लागला होता. IPL 2021 चा पहिला भाग भारतात खेळला गेला, तर IPL च्या 14 व्या हंगामाचा दुसरा भाग UAE मध्ये आयोजित करण्यात आला. आता IPL 2022 चे सामने फक्त मुंबई आणि पुणे येथेच खेळवण्यात येत आहेत. (Corona in IPL)