पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा महान फलंदाज जो रूटने (Joe Root) एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्याने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, इंग्लंड संघाच्या कसोटी सामन्यांतील सततच्या खराब कामगिरीमुळे रूटने हा निर्णय घेतला आहे. तो दीर्घकाळ इंग्लंडचा कर्णधार होता, पण गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाची कामगिरी अत्यंत मध्यम स्वरूपाची आहे. यानंतर त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेत इंग्लंडला एकही सामना जिंकता आला नाही. यानंतरच रूटचे कर्णधारपद धोक्यात आले होते, मात्र त्याने संघाचे कर्णधारपद कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला वेस्ट इंडिज दौ-यासाठी दुसरी संधी देण्यात आली, पण तिथेही संघाने माफक कामगिरी केली. अखेर रूटला राजीनामा द्यावा लागला आहे. देशाच्या संघाचे कर्णधारपद भूषवणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असल्याची भावना रुटने व्यक्त केली आहे.
रुट (Joe Root) पुढे म्हणाला की, त्याला संघाचे कर्णधारपद आवडते. पण ही जबाबदारी स्वीकारल्याचा परिणाम त्याच्यावर नुकताच झाला. या जबाबदारीचा माझ्या खेळावरही परिणाम झाल्याचे त्याने सांगितले. कर्णधारपदाचा त्याग केल्यानंतर, रूट म्हणाला की तो इंग्लंडकडून खेळण्यास उत्सुक आहे आणि संघाला सामने जिंकण्यास मदत करेल. तो संघातील सहकारी, नवा कर्णधार आणि प्रशिक्षक यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.
जो रूट गेली पाच वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचे नेतृत्व करत होता. अॅलिस्टर कूकनंतर त्याने 2017 मध्ये इंग्लंडच्या कसोटी संघाची जबाबदारी स्वीकारली. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघाने एकूण 64 कसोटी सामने खेळले. यापैकी इंग्लंडने 27 सामने जिंकले. त्याचवेळी त्यांच्या संघाला 26 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले, तर 11 सामने अनिर्णित राहिले.
इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार झाल्यानंतर रुटने 64 कसोटी सामन्यांमध्ये 46.44 च्या सरासरीने 5295 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 14 शतके झळकली. त्याचवेळी रुटने आपल्या ऑफस्पिन गोलंदाजीने संघासाठी योगदान दिले आणि 30 बळी घेतले. 2018 मध्ये, रुटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने प्रथमच श्रीलंकेत 3-0 च्या फरकाने मालिका जिंकली. यानंतर 2021 मध्येही त्याने आपल्या संघाला 2-0 ने विजय मिळवून दिला. 2018 साली इंग्लंड संघाने भारतात कसोटी मालिका 4-1 ने जिंकली होती. त्याच वेळी, 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा 3-1 असा पराभव झाला.
रुट (Joe Root) हा कर्णधार म्हणून इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. कसोटीत कर्णधार असताना सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो ग्रॅम स्मिथ, अॅलन बॉर्डर, रिकी पाँटिंग आणि विराट कोहली यांच्यानंतर पाचव्या क्रमांकावर आहे. रुट हा अॅलिस्टर कुकनंतर इंग्लंडसाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) यावर्षी फेब्रुवारीमध्ये प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांची हकालपट्टी केली होती. 2021 च्या ॲशेस मालिकेतील संघाची खराब कामगिरी हेही त्याचे कारण होते. तेव्हापासून पुढची टांगती तलवार कॅप्टन जो रुटवरच टांगलेली होती, असे समजले जात होते. त्याला विंडिज दौऱ्यावर संधी मिळाली असली तरी तेथेही इंग्लंडचा पराभव झाला. सिल्व्हरवुडच्या हकालपट्टीच्या अवघ्या 24 तासांपूर्वी, बोर्डाचे (ECB) व्यवस्थापकीय संचालक ऍशले जाईल्स यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. रिपोर्ट्सनुसार, गाइल्स यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते.