‘R. Ashwin’ने अचानक 'Retired Out' होण्याचा निर्णय का घेतला? | पुढारी

‘R. Ashwin’ने अचानक 'Retired Out' होण्याचा निर्णय का घेतला?

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League)च्या 15 व्या हंगामात बीसीसीआयने अनेक नवीन नियम लागू केले आहेत. नवीन हंगामाच्या 20 व्या सामन्यात, या स्पर्धेच्या इतिहासात यापूर्वी कधीही न पाहिलेले असे काही घडले. 15 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा खेळाडू बाद न होता स्वत:ची ‘विकेट’ टाकून मैदानाबाहेर गेला. राजस्थान (Rajasthan Royals) आणि लखनौ (Lucknow Super Giants) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक फलंदाज ‘रिटायर्ड आऊट’ (Retired Out) झाला.

रविचंद्रन अश्विन (R. Ashwin) इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात रिटायर्ड आऊट (Retired Out) होणारा पहिला फलंदाज ठरला आहे. काल रविवारी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात हा प्रसंग अनुभवायला मिळाला.

आयपीएलच्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्स (LSG) विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या (RR) आर अश्विनने (R. Ashwin) निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. डावाच्या 19व्या षटकात फलंदाजी करताना तो मैदानी पंचांच्या परवानगीशिवाय पॅव्हेलियनमध्ये परतला.

लखनौविरुद्धच्या सामन्यात व्हॅन डर ड्युसेन 9.5 षटकांत बाद झाल्यानंतर अश्विनला (R. Ashwin) सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. 23 चेंडूत 28 धावांचे योगदान दिल्यानंतर अश्विनला वाटले की तो संघाच्या आवश्यकतेनुसार फलंदाजी करू शकणार नाही, तेव्हा त्याने 18.2 व्या षटकात रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे ‘रिटायर्ड आऊट’ बाद होणारा तो आयपीएल इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. अश्विनेने मैदान सोडल्यानंतर रियान परागला मैदानावर येण्याची संधी मिळाली.

या प्रकारावर शिमरॉन हेटमायरने डावानंतरच्या विश्रांतीदरम्यानच्या वेळेत प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, मला अश्विनच्या निर्णयाची कल्पना नव्हती. मी फलंदाजी करत होतो, पण अचानक अश्विनला मैदानाबाहेर पळताना आश्चर्य वाटले. पण त्याने रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेतल्याचे काही क्षणातच समजले.

नियमांचा फायदा उठवण्यात अश्विन हुशार आहे. त्याने ‘मंकडिंग’चा वापर केल्यावर बराच वाद झाला होता. अश्विनच्या या निर्णयावर क्रिकेट जगत दुभंगले होते. आता अश्विन संघाच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयावर काय प्रतिक्रिया देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

रिटायर्ड आऊट म्हणजे काय?

कोणताही बॅटर (फलंदाज) पंच आणि प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराच्या सहमती शिवाय इनिंग सुरू असतानाच मैदान सोडून पॅव्हिलियनमध्ये निघून गेल्यास तो ‘रिटायर्ड आऊट’ झाला असे समजतात. नियमानुसार त्या खेळाडूला बाद ठरवले जाते. एकदा ‘रिटायर्ड आऊट’ झालेला बॅटर त्या इनिंगमध्ये पुन्हा फलंदाजीसाठी येऊ शकत नाही. दुसरीकडे रिटार्ड हर्ट झालेला बॅटर टीमला गरज असेल तर पुन्हा बॅटींगसाठी मैदानात येऊ शकतो.

राजस्थानने रविवारी झालेल्या मॅचमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा 3 रननं निसटता पराभव केला. 166 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 आऊट 162 पर्यंत मजल मारली.

लखनऊविरुद्धच्या या विजयामुळे राजस्थानची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. राजस्थानने या मोसमात 4 पैकी 3 मॅच जिंकल्या असून एका मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. दुसरीकडे लखनऊची टीम क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे, लखनऊने 5 पैकी 3 विजय मिळवले आणि 2 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे घडले आहे…

आयपीएलमध्ये हे पहिल्यांदाच घडलं असेल पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असं घडलं आहे. 2019 मधील दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भूतानची सोनम तोग्बे मालदीवविरुद्ध 19 व्या षटकात रिटायर्ड आऊट झाली होती.

 

Back to top button