जय शहा यांची ICC मध्ये एंट्री! पाकिस्तानला मोठा झटका | पुढारी

जय शहा यांची ICC मध्ये एंट्री! पाकिस्तानला मोठा झटका

दुबई; पुढारी ऑनलाईन

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची आयसीसी क्रिकेट समितीवर (ICC Cricket Committee) सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर महेला जयवर्धने यांची माजी खेळाडू प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. दुबई येथे झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमिझ राजा यांचा चार देशांच्या टी२० मालिकेचा प्रस्ताव आयसीसी बोर्डाने एकमताने फेटाळला. यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामने तटस्थ देशांत होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे.

भारतासह पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या टी२० स्पर्धेचा प्रस्ताव रमिझ राजा यांनी सादर केला होता. पण आयसीसीनं एकमतानं हा प्रस्ताव फेटाळला. भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध केवळ विश्वचषक आणि आशिया कप स्पर्धेत खेळतो. दोन्ही देशांदरम्यान सर्व मालिका बंद आहेत.

दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शहा यांचा आयसीसी (ICC) क्रिकेट समितीत समावेश करण्यात आला आहे. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले हे त्यांचा कार्यकाळ येत्या नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करणार आहेत. आयसीसीचे अध्यक्षपद भारताला मिळावे यासाठी बीसीसीआयकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे समजते.

अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी ऑक्टोबरच्या अखेरीस त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे आयसीसीला नवीन अध्यक्ष शोधण्यासाठी पूर्ण वेळ मिळेल आणि बीसीसीआय यामध्ये मोठी भूमिका बजावू शकेल, अशी रणनिती आखण्यात आली आहे.

आयसीसी बोर्डाच्या एका सदस्याने म्हटले आहे की, “बार्कले यांच्या फेरनामांकनावर कोणतीही चर्चा झालेली नाही. पण ते ऑक्टोबरच्या अखेरीस अध्यक्ष म्हणून त्यांचा सध्याचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. त्यामुळे नवीन अध्यक्ष नियुक्तीची प्रक्रिया नोव्हेंबरमध्येच सुरू होईल.”

आयसीसीचे पुढील अध्यक्ष म्हणून जय शहा यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पण बीसीसीआयच्या सचिवांनी किंवा त्यांच्या जवळच्या सूत्रांनीही याला अद्याप दुजोरा दिलेला नाही.

 हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : उस्मानाबाद ; उमरगा इथं पार पडला शिव-पार्वती विवाह सोहळा

 

Back to top button