

icc womens t20 world cup 2026 final match venue lords ground in england
लंडन : आयपीएलचा थरार सुरू असतानाच आयसीसीने क्रिकेट चाहत्यांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. पुढील वर्षी म्हणजेच 2026 मध्ये खेळवल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकाबाबत आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा कुठे आयोजित करायची याचा निर्णय आधीच घेण्यात आला होता, परंतु अंतिम सामन्याबाबत परिस्थिती स्पष्ट नव्हती, पण आता आयसीसीनेही त्याची घोषणा केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाईल, असे आयसीसीने जाहीर केले आहे. त्याचे यजमानपद इंग्लंडकडे आहे.
आयसीसीच्या माहितीनुसार, 2026च्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेचे सामने इंग्लंडमधील सहा ठिकाणी आयोजित केले जातील. यासाठी लॉर्ड्स व्यतिरिक्त ओल्ड ट्रॅफर्ड, हेडिंग्ले, एजबॅस्टन, हॅम्पशायर बाउल, द ओव्हल आणि ब्रिस्टल काउंटी ग्राउंडची नावे अंतिम करण्यात आली आहेत.
2026 च्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी होणार आहेत. याची सुरुवात 12 जूनला होईल. तर अंतिम सामना 5 जुलै खेळवला जाणार आहे. सर्व 12 संघांना प्रत्येकी सहा अशा दोन गटात स्थान देण्यात आले आहे. स्पर्धेत एकूण 20 लीग सामने होतील, त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी होईल. आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी या संदर्भात सांगितले की, ‘महिला टी-20 विश्वचषक 2026 या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी लॉर्ड्स हा सर्वोत्तम पर्याय होता, ज्याच्यावर शिक्कामोर्तम करण्यात आला आहे.’