R Ashwin चा WTC मध्ये सर्वात मोठा पराक्रम!, विकेट्सचे ‘शतक’ पूर्ण करणारा पहिला गोलंदाज | पुढारी

R Ashwin चा WTC मध्ये सर्वात मोठा पराक्रम!, विकेट्सचे ‘शतक’ पूर्ण करणारा पहिला गोलंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने (R Ashwin) कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी सुरूच ठेवली आहे. अश्विनने श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १२ बळी घेतले. याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये ४४२ बळी मिळवून सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. याशिवाय त्यांने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये एक नजरेत भरेल अशी कामगिरी केली आहे. अश्विनच्या नावावर आता WTC मध्ये सर्वाधिक १०० विकेट्सची नोंद झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विकेट्सचे शतक पूर्ण करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.

आर अश्विननंतर (R Ashwin), ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स आहे. कमिन्सच्या नावावर सध्या ९३ विकेट्स आहेत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (८३ विकेट्स) तिसऱ्या, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउथी (८० विकेट्स) चौथ्या, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (७४ विकेट्स) पाचव्या आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायन (७४ विकेट्स) सहाव्या क्रमांकावर आहे.

अश्विनने वॉर्नची बरोबरी साधली

अश्विनने (R Ashwin) आणखी एक विशेष कामगिरी आपल्या नावावर केली. बंगळूर कसोटीत श्रीलंकेविरुद्ध अखेरची विकेट घेत सामना जिंकण्याच्या बाबतीत त्याने ऑस्ट्रेलियाचा दिवंगत स्टार शेन वॉर्नची बरोबरी केली. वॉर्न आणि अश्विनने सामन्यातील शेवटची विकेट घेत संघाला २२ वेळा विजय मिळवून दिला.

अश्विनने भारतासाठी कसोटी मालिकेत सर्वाधिक १२ बळी घेण्याची ही १२ वी वेळ आहे. त्याने भारतात संघासाठी १८ कसोटी मालिका खेळल्या आहेत.

अश्विनने स्टेनचा ४३९ बळींचा विक्रम मोडला

अश्विनने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. बंगळूर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात दोन विकेट घेत त्याने डेल स्टेनचा ४३९ बळींचा विक्रम मोडला. आता तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा आठवा गोलंदाज बनला आहे.

अश्विनने सामन्याच्या तिस-या दिवशी पहिल्या सत्रात कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि कुशल मेंडिस यांची भक्कम भागीदारी मोडीत काढली. त्याने मेंडिसला बाद करत डेल स्टेनच्या विक्रमाची बरोबरी केली. श्रीलंकेच्या या दोन खेळाडूंमध्ये ९७ धावांची भागीदारी झाली. अश्विनने कुशल मेंडिसला विकेटच्या मागे झेलबाद केले. मेंडिस ५४ धावा करून बाद झाला. यानंतर अश्विनने श्रीलंकेला १०५ धावांवर आणखी एक धक्का दिला. या धावसंख्येवर त्याने धनंजय डी सिल्वाला (४) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ही विकेट पडताच अश्विन दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींच्या यादीत आठव्या क्रमांकावर पोहोचला.

Back to top button