INDvsSL Test Day 3 : भारताचा श्रीलंकेला क्लीन स्विप, कसोटी मालिका २-० ने जिंकली | पुढारी

INDvsSL Test Day 3 : भारताचा श्रीलंकेला क्लीन स्विप, कसोटी मालिका २-० ने जिंकली

पुढारी ऑनलाईन डेस्क :

बंगळूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेचा 238 धावांनी पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केला. श्रीलंकेसमोर 447 धावांचे लक्ष्य होते, प्रत्युत्तरात पाहुण्या संघाला 208 धावाच करता आल्या आणि सामना गमवावा लागला. भारताच्या विजयात आर अश्विनने 4 आणि जसप्रीत बुमराहने 3 बळी घेतले. अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजाच्या खात्यात 2 विकेट आल्या.

कालच्या 1 बाद 28 या धावसंख्येच्या पुढे खेळताना, श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि कुसल मेंडिस यांनी चांगली सुरुवात केली. पहिल्या अर्ध्या तासात त्यांनी झटपट 97 धावा केल्या. मेंडिस चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता पण वैयक्तिक 54 धावांवर तो यष्टीचीत झाला. त्यानंतर विकेट्सची पडण्याची मालिका सुरू झाली. अँजेलो मॅथ्यूज 1, धनंजय डी सिल्वाने 4 धावा करून बाद झाले. डी सिल्वाची विकेट अश्विनने घेतली आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत डेल स्टेनला मागे टाकले. या सत्रात श्रीलंकेने 32 षटके खेळली आणि 3 गडी गमावून 123 धावा केल्या. चहापानापर्यंत श्रीलंकेच्या संघाने 39 षटकांत 4 बाद 151 धावा केल्या. कर्णधार दिमुथ करुणारत्ने 67 तर निरोशन डिकवेलाने 10 धावा केल्या. श्रीलंका अजून 296 धावांनी मागे होता आणि 6 विकेट्स हातात होत्या.

चहापानानंतर डिकवेला 12 आणि चरिथ अस्लंका 5 धावा करून अक्षर पटेलचे बळी ठरले. एकाबाजूने विकेट्स पडत होत्या पण करुणारत्नेने दुस-याबाजूने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि त्याने सुरेख शतक झळकावले. जसप्रीत बुमराहने करुणारत्नेला 107 धावांवर बाद केले. यानंतर तळातील फलंदाजांनी फक्त मैदानावर हजेरी लावत एकामागूनएक पॅव्हेलियन गाठले. याचबरोबर त्यांचा दुसरा डाव 59.3 षटकात 208 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून रविचंद्रन अश्विनने 4 बळी घेतले.

घरच्या मैदानावर भारतीय संघाचा हा सलग 15 वा कसोटी मालिका विजय आहे. भारताने नोव्हेंबर 2012 मध्ये इंग्लंडविरुद्धची शेवटची मायदेशात कसोटी मालिका गमावली होती. त्यावेळी महेंद्रसिंग धोनी संघाचा कर्णधार होता. त्यानंतर भारतीय संघाने घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. आजपर्यंत कोणत्याही संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर इतक्या मालिका जिंकल्या नाहीत.

त्याचबरोबर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत तिसऱ्यांदा क्लीन स्वीप केला आहे. यापूर्वी 1993/94 आणि 2017 मध्ये भारताने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेचा 3-0 असा पराभव केला होता.

करुणारत्नेची कर्णधारपदाची खेळी वाया…

एका टोकाकडून विकेट पडत असताना श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने दुसऱ्या बाजूने टीच्चून फलंदाजी केली. त्याने शानदार फलंदाजी करताना 166 चेंडूत कसोटी क्रिकेटमधील 14 वे शतक पूर्ण केले. त्याचे भारताविरुद्धचे हे दुसरे शतक आहे. मात्र जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला. दिवस-रात्र कसोटीतील हे त्याचे दुसरे शतक ठरले. तर कर्णधार म्हणून त्याचे हे सहावे शतक होते. चौथ्या डावात 1000 धावा करणारा तो श्रीलंकेचा तिसरा खेळाडू ठरला. कुमार संगकारा (1163) आणि महेला जयवर्धने (1096) हे खेळाडू त्याच्या पुढे आहेत.

अक्षरकडून अस्लंकाची शिकार..

श्रीलंकेला सहावा धक्का देत अक्षर पटेलने भारताला पुन्हा एकदा मोठे यश मिळवून दिले आहे. यावेळी त्याने पाच धावांवर चरिथ अस्लंकाला रोहित शर्माकरवी झेलबाद केले. यावेळी श्रीलंकेची धावसंख्या 6 बाद 180 होती.

करुणारत्ने-डिकवेला यांच्यात अर्धशतकी भागीदारी

श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेसह निरोशन डिकवेलाने पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. सुरुवातीच्या धक्क्यातून श्रीलंकेला सावरण्यात हे दोन्ही खेळाडू यशस्वी ठरले. पण 55 धावांच्या भागिदारीनंतर अक्षर पटेलने पाहुण्या संघाला पाचवा झटका दिला. त्याने डिकवेलाला माघारी धाडले. डिकवेलाने 39 चेंडूत 12 धावा केल्या.

Image

पहिले सत्र संपले

तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र संपले. हा हंगाम दोन्ही संघांसाठी बरोबरीचा होता. भारताने तीन गडी बाद केले तर श्रीलंकेने 123 धावा केल्या. दिवसाच्या सुरुवातीला कर्णधार दिमुथ आणि मेंडिस यांनी दुसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. यादरम्यान मेंडिस आणि करुणारत्ने यांनी अर्धशतके झळकावली.

करुणारत्नेचे अर्धशतक

श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने शानदार फलंदाजी करताना आपले अर्धशतक पूर्ण केले. आपल्या संघाचा डाव पुढे नेत त्याने 92 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

Image

अश्विनने स्टेनला मागे टाकले

रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 440 बळी पूर्ण केले आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला मागे टाकले आहे. सर्वाधिक कसोटी बळींच्या बाबतीत अश्विन आता आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

अश्विनचे ​​दुसरे यश, श्रीलंकेची चौथी विकेट

भारताला आणखी एक यश मिळाले आहे. पुन्हा एकदा रविचंद्रन अश्विनने श्रीलंकन फलंदाजाला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्याने धनंजय डी सिल्वाला विहारीकरवी झेलबाद केले. डी सिल्वाने 21 चेंडूत 4 धावा केल्या. यावेळी श्रीलंकेची धावसंख्या 4 बाद 105 होती.

Image

अँजेलो मॅथ्यूज बाद..

श्रीलंकेला दोन षटकांत दुसरा मोठा धक्का बसला. रवींद्र जडेजाने 20.4 व्या षटकात अँजेलो मॅथ्यूजला क्लीन बोल्ड केले. यासह श्रीलंकेने तिसरी विकेट गमावली. यावेळी त्यांची धावसंख्या 98 होती. मॅथ्यूज केवळ एक धाव काढून बाद झाला.

Image

श्रीलंकेला दुसरा धक्का, मेंडिस बाद

कुसल मेंडिस 54 धावांवर अश्विनच्या चेंडूवर यष्टीचीत झाला. यचबरोबर श्रीलंकेने दुसरी विकेट गमावली, तर अश्विनने डावातील पहिली विकेट घेतली. मेंडिसने 60 चेंडूत 54 धावा केल्या. त्याने आपल्या अर्धशतकी खेळीत ८ चौकार फटकावले.

श्रीलंकेला दुसरा धक्का, मेंडिस बाद

कुसल मेंडिस 54 धावांवर अश्विनच्या चेंडूवर यष्टीचीत झाला. यचबरोबर श्रीलंकेने दुसरी विकेट गमावली, तर अश्विनने डावातील पहिली विकेट घेतली. मेंडिसने 60 चेंडूत 54 धावा केल्या. त्याने आपल्या अर्धशतकी खेळीत 8 चौकार फटकावले. त्याने शानदार फलंदाजी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला आणि 56 चेंडूत कसोटी कारकिर्दीतील 12वे अर्धशतक झलकावले.

मेंडिस-करुणारत्न यांच्यात अर्धशतकी भागीदारी

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर श्रीलंकेने संयमी फलंदाजी केली. पाहुण्या संघाने सुरुवातीच्या तासाला एकही विकेट न गमावता 74 धावा केल्या. कुसल मेंडिस आणि दिमुथ करुणारत्न यांनी श्रीलंकेसाठी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.

श्रीलंकेची फलंदाजी सुरू..

श्रीलंकेने आज सामन्याच्या तिस-या दिवशी एक बाद 28 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. कर्णधार दिमुथ करुणारत्न 19 आणि कुसल मेंडिस 16 धावांवर खेळत आहेत. लाहिरू थिरिमाने रविवारी शून्यावर बाद झाला.

भारताचा पहिला डाव..

 • बंगळूर कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया पहिल्या डावात 252 धावांवर सर्वबाद झाली.
 • श्रेयस अय्यरने 98 चेंडूत 92 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकार मारले.
 • याशिवाय ऋषभ पंतने 39 आणि हनुमा विहारीने 31 धावा केल्या.
 • विराट कोहली 23 आणि रोहित शर्मा 15 धावा करून बाद झाला.
 • मयंक 4 धावा, रवींद्र जडेजा 4 धावा, अश्विन 13 धावा, अक्षर पटेल 9 धावा आणि शमी 5 धावा करून बाद झाले.
 • श्रीलंकेकडून अंबुलदेनिया आणि जयविक्रमाने प्रत्येकी तीन बळी घेतले. त्याचवेळी धनंजय डी सिल्वाला दोन आणि लकमलला एक विकेट मिळाली.

श्रीलंकेचा पहिला डाव..

 • भारताच्या 252 धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव 109 धावांवर आटोपला.
 • अँजेलो मॅथ्यूजने सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याचवेळी निरोशन डिकवेलाने 21 धावांची खेळी केली.
 • श्रीलंकेच्या आठ फलंदाजांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही.
 • कुसल मेंडिस 2, कर्णधार दिमुथ करुणारत्ने 4, लाहिरू थिरिमाने 8 आणि चरिथ अस्लंका 5, धनंजय डी सिल्वाने 10
 • तर तळातील फलंदाज अंबुलदेनिया 1, लकमलने 5 आणि विश्वा फर्नांडो 8 धावांवर बाद झाले. जयविक्रम एक धाव करून नाबाद राहिला.
 • भारताकडून जसप्रीत बुमराहने पाच विकेट घेतल्या. त्याने भारतीय भूमीवर पहिल्यांदाच डावात पाच बळी घेतले आणि एकूण आठव्यांदा डावात पाच बळी घेतले.

Back to top button