पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाने बंगळूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा २३८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केला आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेतही मोठा फायदा झाला आहे. टीम इंडिया आता एका स्थानाचा फायदा घेत चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. भारताचे एकूण गुण आता ७७ झाले आहेत. पहिल्या, दुस-या आणि तिस-या स्थानावरील संघाच्या तुलनेत हे गुण जास्त आहेत. मात्र, गुणतालिकेतील स्थान परसेंटेज पॉइंट्सवरून निश्चित केले जाते. श्रीलंकेवरील विजयानंतर भारताचे 58.33 टक्के गुण झाले आहेत. त्याच वेळी, श्रीलंकेच्या या पराभवानंतर, त्यांचे परसेंटेज पॉइंट्स 50 टक्क्यांवर वर गेले आहेत.
कसोटी चॅम्पियनशिपचा (WTC) दुसरा अंतिम सामना २०२३ मध्ये खेळवला जाईल. टीम इंडियाने २०२२ कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत आणि ६ सामने जिंकले आहेत. एका सामन्यातील विजयासह संघाचे १२ गुण होतात. कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताला अजून सात सामने खेळायचे आहेत. यातील सहा सामने आशिया खंडात खेळवले जाणार आहेत. भारत इंग्लंडमध्ये एक कसोटी, बांगलादेशमध्ये दोन कसोटी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात चार कसोटी सामने खेळणार आहे. इंग्लंडमधील एकमेव कसोटी वगळता इतर सर्व सामने जिंकणे भारतासाठी सोपे जाईल. ऑस्ट्रेलियन संघ भारतीय मैदानांवर आव्हान देऊ शकतो, पण फिरकी खेळपट्टीवर भारतीय संघाचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे, हे विसरून चालणार नाही. याआधी 2021 मध्ये भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची पहिली फायनल खेळली होती, पण त्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना कराचीमध्ये खेळला जात आहे, जर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला तर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानला मागे टाकेल आणि टॉप-3 मध्ये स्थान मिळवेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या क्रमांकावर कायम राहील.
कसोटी चॅम्पियनशिपमध्ये (WTC) प्रत्येक संघाला ६ मालिका खेळायच्या आहेत. ३ मायदेशात आणि ३ परदेशात. भारताने परदेशातील दोन मालिकांमधील ७ पैकी ३ सामने जिंकले आहेत. तर सामने गमावले असून एक कसोटी अनिर्णित राहिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील एक सामना पुढे ढकलण्यात आला आहे. ती कसोटी यंदा खेळवली जाणार आहे. या सामन्याशिवाय भारताला इतर सर्व सामने अनुकूल परिस्थितीत खेळायचे आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामनेही घरच्या मैदानावर होणार आहेत.
बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने बांगलादेशमध्ये खेळवले जाणार आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात टीम इंडियाचे चांगले प्रदर्शन राहिले आहे. गेल्या ११ कसोटींपैकी ९ भारताने जिंकल्या आहेत. १ सामना अनिर्णित राहिला आहे. फक्त एक गमवावा लागला आहे. दुसरीकडे भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध कधीही कसोटी हरलेला नाही. म्हणजेच या मालिकांमध्ये भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार असेल. हे सर्व सामने भारत जिंकेल अशी शक्यता आहे. इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातही भारताचा दावा फेटाळता येणार नाही. भारताने नुकतेच तेथे ४ पैकी २ सामने जिंकले, १ हरला आणि १ सामना अनिर्णित राहिला. अशा स्थितीत टीम इंडिया डब्ल्यूटीसीची फायनलही खेळू शकेल.